Athani

लक्ष्मण सवदी यांचे विश्वासघाताचे बिल चुकते करा : अमित शाह

Share

राज्याची निवडणूक वेगळी आणि अथणीची निवडणूक वेगळी आहे, डबल इंजिन सरकारसाठी आणि अथणीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्या लक्ष्मण सवदीना पराभूत करण्यासाठी भाजपला मतदान करा आणि सवदी यांचे विश्वासघाताचे बिल चुकते करा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.


अथणी मतदारसंघातील भाजप उमेदवार महेश कुमठळ्ळी यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांनी अथणी येथील भोजराज विद्यालयाच्या मैदानावर भव्य जाहीर सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या निवडणुकीत महेश कुमठळ्ळी यांनी लक्ष्मण सवदी यांचा पराभव केला होता. तरीही येडियुरप्पा सरकारमध्ये त्यांना मंत्री केले. ते
हरल्यावर मी सवदी यांच्याशी बोललो होतो, त्यांनीच मला एमएलसी करा असं सांगितलं. त्यामुळे त्यांना आम्ही आमदार केले, मंत्री केले. त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि बजरंगबलीचा अपमान करणाऱ्या पक्षात प्रवेश केला. आमदारकीची मुदत शिल्लक असतानाही तुम्ही पक्ष का सोडला, असा सवाल त्यांना केला पाहिजे असे शाह म्हणाले.

अमित शाह पुढे म्हणाले की, काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देतो म्हणत आहे. लिंगायत आरक्षण काढून मुस्लिम समाजाला देणार का? बंधू लक्ष्मण वारंवार माझ्याकडे म्हादई योजनेसाठी येत होता, तेव्हा काँग्रेसला शिवीगाळ करीत होता मग आता नेमके काय झाले? असे शाह म्हणाले. गोवा निवडणुकीत सोनिया गांधींनी कर्नाटकला म्हादईचे पाणी देणार नाही म्हटले होते. पण सोनिया गांधीही गेल्या आणि त्यांचा पक्षही गोव्यातून गेला. मोदी आल्यानंतर उत्तर कर्नाटकला म्हादईचे पाणी देण्याचे काम सुरू झाले आहे. जारकीहोळी आणि महेश आल्यानंतर येडियुरप्पा कर्नाटकात सत्तेवर सरकार आले आहे असे शाह म्हणाले.

राहुल बाबांनी पाच गॅरंटी दिल्या आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा येथे दिलेल्या गॅरंटीचे काय झाले असा सवाल करून अमित शाह म्हणाले की, जनतेने तुमचा सर्वत्र पराभव केला आहे, कर्नाटकात तुमची हमी, भरवसा नव्हे तर मोदींवर जनतेचा भरवसा आहे. खर्गे, तुम्ही मोदींना किती शिव्या घालताय. पण तुम्ही जितक्या शिव्या घालाल तितके कमळ अधिक फुलेल, असा टोमणा शहा यांनी खर्गे यांना मारला. भाजपने पीएफआयवर बंदी घातली आहे पण काँग्रेस त्याला संरक्षण देत आहे. बजरंग बलींचा अपमान करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. सिद्धरामय्या तुम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणात आंधळे झाला आहात. तुम्ही श्रीरामाला कैदेत ठेवले, बजरंगबलीचा जन्म दिवस विचारला. तुम्हाला माहित नाही का, हनुमान जयंती तो दिवस आहे ज्या दिवशी बजरंग बलीचा जन्म झाला होता. तुम्ही बजरंग बलीचा अपमान करता आणि लोक तुम्हाला धडा शिकवतील. लक्ष्मण सवदी यांनी भाजप पक्षाच्या विचारसरणीशी गद्दारी केली आहे. तुम्ही महेशला विजयी करा आणि सवदींच्या विश्वासघाताचे बिल चुकते करा, असे म्हणत शाह यांनी लक्ष्मण सवदी यांना फटकारले.

भाषणाच्या प्रारंभी अमित शाह यांनी बजरंग बलीचा जयघोष केला. कन्नडमध्ये बोलता येत नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. शिवयोगी मुरगेंद्र स्वामीजी, यल्लम्मा देवी आणि जगज्योती बसवण्णा यांचा उल्लेख करून शाह यांनी भाषणाला सुरुवात केली. कित्तूर राणी चेन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा यांची ही भूमी आहे. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले आहेत. या प्रसंगी मी शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो असे ते म्हणाले.

Tags: