प्रभू श्रीराम अन बजरंग बली ही आमची ओळख आहे. ती पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, अन भाजपला बहुमताने निवडून द्या असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारासाठी बेळगावातील टिळक चौकात देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, भाजपच्या डबल इंजिन सरकारने देशात आणि कर्नाटकात मोठा विकास केला आहे. मोदी पंतप्रधान झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था जगात 11व्या क्रमांकावर होती, ती 5 व्या क्रमांकावर नेण्याचे काम मोदींनी केले. बेघरांना डोक्यावर हक्काचे छत, महिलांना गॅस, शौचालये, घरोघरी शुद्ध पाणी, वीजजोडण्या दिल्या. देशाचा काळा पैसा पुन्हा देशाच्या तिजोरीत आणून विकास केला.
देशाचे बजेट 48 लाख कोटींवर नेले. भारताला विश्वगुरू बनण्याइतपत समर्थ केले. त्यामुळेच आज रशिया-युक्रेन युद्ध सुरु असले तरी या दोन्ही देशांना मोदींच्या मध्यस्थीची अपेक्षा आहे. यापूर्वी पाकिस्तान काश्मीरमध्ये, भारतात बॉम्बस्फोट व इतर कुरापती करायचा. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकार निंदा, घोरनिंदा आणि फार तर संयुक्त राष्ट्रात तक्रार करण्याची भीती घालायचा. नंतर पाकिस्तान पुन्हा तशाच कुरापती करायचा. परंतु मोदींनी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करून पाकिस्तानची आणि तेथील दहशतवाद्यांना धडा शिकवला असे फडणवीस म्हणाले.
केंद्रात मोदी आणि कर्नाटकात येडियुरप्पा, बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या डबल इंजिन सरकारने मूलभूत सुविधांचा विकास करण्यासह अनेक लोककल्याणकारी प्रकल्प राबवले आहेत. विकासाचे हे पर्व सुरु ठेवण्यासाठी भाजपला निवडणून देणे गरजेचे आहे. यापूर्वी कर्नाटकाच्या जनतेने कधी कुमारस्वामी तर कधी सिद्दरामय्या यांची सर्कस पाहिली आहे. त्यापासून बोध घेतला पाहिजे. काँग्रेस तर सत्तेवर येणारच नाही, तरीही सिद्दरामय्या, डी. के. शिवकुमार, एम. बी. पाटील आणि खर्गे देखील मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पहात आहेत. केवळ एका समाजाचे लांगुलचालन करणाऱ्यांना धडा शिकविण्याची ही वेळ आहे.
मागे काँग्रेस सरकारने रामसेतूच्या मुद्द्यावर, राम हे एक काल्पनिक पात्र आहे, रामसेतू तोडायला आमची काही हरकत नाही असे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दिले होते. राम आणि बजरंग बली, हिंदुत्व, हिंदू संस्कृती ही आमची ओळख आहे. ती पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, भाजपच्या डबल इंजिन सरकारला बेळगाव उत्तरचा डबा जोड, रवी पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी बोलताना भाजप उमेदवार रवी पाटील यांनी, कुठलाही भेदभाव, भाषाभेद न करता बेळगावचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मला बहुमताने निवडून द्या असे आवाहन केले.
यावेळी खा. मंगल अंगडी, महानगर भाजप अध्यक्ष आ. अनिल बेनके, सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, शंकरगौडा पाटील, दादागौडा पाटील, योगेंद्र पाटील, विजय कोडगनूर, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती आदी उपस्थित होते.


Recent Comments