काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा हा केवळ निवडणूक जाहीरनामा नसून, समृद्ध, नवकर्नाटकाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याची माहिती जाहीरनामा रचना समितीचे सदस्य राधाकृष्ण यांनी दिली.
बेळगावात काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण यांनी सांगितले की, प्रशासनच नसलेल्या राज्यात सुशासन आणणे, राज्यातील जनतेचे जीवन सुखी व समृद्ध करणे, सर्व जातीधर्मांमध्ये सौहार्द प्रस्थापित करून शांतता प्रस्थापित करणे याला प्राधान्य देऊन काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा मांडणी करण्यात आली आहे. “सर्व समुदायांचे नंदनवन” ही संकल्पना नजरेसमोर ठेवून त्याची रचना करण्यात आली आहे. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री डॉ. जि परमेश्वर, मी आणि मधु बंगारप्पा अशी तीन सदस्यीय जाहीरनामा समिती पक्षाने नेमली होती.
त्यानुसार, अगदी मोलकरणी, रस्त्यावरील विक्रेते, व्यापारी, शेतकरी, कष्टकरी, रिक्षाचालक, महिला, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी अशा विविध समाजघटकांची आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मते, सल्ले व सूचना विचारात घेऊन काँग्रेसचा हा जाहीरनामा तयार केला आहे. राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाची हा जाहीरनामा म्हणजे ब्ल्यू प्रिंट आहे असा दावा राधाकृष्ण यांनी केला.
पत्रकार परिषदेला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, सुनील हणमन्नावर, जगदीश सावंत आदी उपस्थित होते.


Recent Comments