Belagavi

कोनवाळ गल्लीत नळ-ड्रेनेजच्या अर्धवट कामांमुळे गैरसोय

Share

बेळगावातील कोनवाळ गल्लीत नळ-ड्रेनेजच्या अर्धवट कामांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी बोअरवेल बंद केल्याने स्थानिकांनी महापालिकेविरोधात रोष व्यक्त केला आहे.
तुम्ही पाहताय ही एक चर आहे ज्यात पाण्याचे नळ बसवायला घेतले होते, पण काम अपूर्ण आहे. बाहेर पाऊल टाकल्यास दगड आणि मातीचे ढीग दिसतात.

शहरातील कोनवाळ गल्ली येथे गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांचाही सतत गोंधळ उडत आहे. जलवाहिन्या घालण्याचे काम अर्ध्यावरच बंद पडले असून रस्त्यावर मातीचे, खडीचे ढीग पडले आहेत. येथील गटारीही तुंबल्या आहेत.

याबाबत स्थानिक रहिवासी उषा तरळे यांनी सांगितले की, ३-४ महिन्यांपूर्वी जलवाहिन्या घालण्यासाठी चर मारण्यात आली होती. पण काम पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांसह महिला, लहान मुले, वृद्धांना त्रास होत आहे. रस्त्यात खड्डे पडले असून त्यात पडून अनेकजण जखमी होत आहेत. पाणी पुरवठाही समर्पक होत नाही.

अन्य स्थानिक महिलांनी सांगितले की, चर न बुजवल्याने गटारीत माती, कचरा साठून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे डासांची पैदास वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची विनंती त्यांनी केली.

एकंदर कोनवाळ गल्लीतील रहिवाशांना महापालिकेच्या संथ गतीच्या कामांचा फटका बसत असून, नागरिकांची समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यावर महापालिका काय पावले उचलते हे पहावे लागेल.

Tags: