Belagavi

भाजप सरकार हे भ्रष्टाचाराचे डबल इंजिन सरकार : पृथ्वीराज चव्हाण

Share

कर्नाटक आणि देशातील भाजप सरकार हे भ्रष्टाचाराचे डबल इंजिन सरकार आहे. त्याला विटलेली कर्नाटकातील जनता त्याचे पतन करेल. या निवडणुकीत काँग्रेस १३० जागा जिंकून सत्तेत येईल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा भ्रष्टाचार आणि राज्यात बोम्मई सरकारचा भ्रष्टाचार अशा डबल भ्रष्टाचाराचे भाजपचे डबल इंजिन सरकार असल्याचा आरोप केला. अदानी यांच्या कंपन्यांमधील वीस हजार कोटी रुपयांची बेनामी गुंतवणूक, सरकारी उद्योगांची अदानींना विक्री अशा मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला म्हणून मानहानीचा खोट्या खटल्यात गुंतवून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. पण जनतेला हे सगळे कळत आहे. कर्नाटकात यावेळी जनता भाजपला अव्हेरून काँग्रेसला विजयी करेल, काँग्रेस किमान १३० हुन अधिक जागा जिंकून सत्तेवर येईल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

कर्नाटक हे देशातील एक महत्वाचे राज्य आहे. देशाच्या विकासात बेंगळूर आणि कर्नाटकाने मोठे योगदान दिले आहे. मात्र भाजप सरकारमुळे आज ही ओळख पुसली जाऊन ४०% भ्रष्टाचाराचे राज्य म्हणून त्याची देशात नवीन दुर्दैवी ओळख झाली आहे.

 

कंत्राटदार संघटनेने मंत्र्यांकडून ४०% लाच मागितली जात असल्याची भ्रष्टाचाराची तक्रार मोदींकडे करूनही काहीही कारवाई होत नाही, हिंदू हनी नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या संतोष पाटील या कंत्राटदाराने मंत्र्यांकडून ४०% लाच मागितली जाते, ती देणे शक्य नसल्याचे नमूद करून डेथ नोट लिहून आत्महत्या केली. एवढे भक्कम पुरावे असूनही मंत्री ईश्वरप्पा यांना केवळ पदावरून हटवले, चौकशीचे नाटक करून क्लीन चिट देण्यात येते. यावरून भाजप सरकारचा भ्रष्टाचार दिसून येतो. आता असे भ्रष्ट, हुकूमशाही पद्धतीचे सरकार आणायचे की शब्द पाळणारे, लोककल्याणचे काँग्रेस सरकार आणायचे याचा विचार करण्याची वेळ जनतेवर आली आहे. जनता योग्य निर्णय घेऊन काँग्रेसला विजयी करेल असे चव्हाण म्हणाले.

निपाणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा का केला? एनसीपीने राज्यात ४० उमेदवार का उभे केले माहित नाही. पण याने मतविभागणी होऊन भाजपला फायदा होण्याची शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
यावेळी काँग्रेस निरीक्षक नवाजुद्दीन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम खतीब, माजी नगरसेवक पिरजादे आदी उपस्थित होते.

Tags: