Belagavi

भाजपचा जाहीरनामा बंडल, लोकांची दिशाभूल करणारा : सतीश जारकीहोळी यांची टीका

Share

लोकांची मते मिळवण्यासाठी भाजपने बंडल जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांच्याकडे याची अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती, क्षमता नाही, अशी बोचरी टीका केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केली.

गोकाक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार असूनही त्यांनी या योजना राबवल्या नाहीत. अन आता ते आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. भाजप हा आश्वासनांचा गठ्ठा असलेला पक्ष असून चार वर्षांत 10 लाख घरे बांधणार असल्याचे ते म्हणाले. अजून एकही घर बांधलेले नाही. आम्ही सत्तेत असताना बांधलेल्या घराचे बिल त्यांच्या सरकारने अद्याप दिलेले नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
काँग्रेस पक्षाने यापूर्वीच पाच गॅरंटी कार्ड जाहीर केली आहेत. आमचा पक्ष दिलेल्या आश्वासनाला जागतो. या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे 50 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. खर्चिक होऊ शकते. हा जाहीरनामा राबवण्यासाठी पैसा कुठून आणायचा, याची तयारी आमच्या पक्षाने केली आहे. आमच्याकडे भाजपसारखा बंडल जाहीरनामा नाही. आधीच आमच्या नेत्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे की, आमच्या पक्षाने जारी केलेले सर्व जाहीरनामे राज्यात 100 टक्के लागू केले जातील.

बंगळुरूमध्ये १० लाख नोकऱ्या निर्माण होतील, सरकारी शाळा उच्च दर्जाचे शिक्षण देतील, असे भाजपने सांगितले होते. पण बंगळुरूमध्ये या नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत. तसेच सरकारी शाळांत दर्जेदार शिक्षण देतो म्हणत त्यांनी सुमारे 5000 सरकारी शाळा बंद केल्या आहेत. आता सिंचन योजनेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने चार वर्षे काय केले? भाजपने यापूर्वी 600 आश्वासने दिली होती. त्यातील केवळ 50 टक्केच पूर्तता झाली. त्यामुळे लोकांचा भाजपवर विश्वास नाही. त्यामुळेच राज्यातील जनता काँग्रेसकडे वळली आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जमा केलेला काळा पैसा परत आणण्याचे आणि सार्वजनिक खात्यांमध्ये 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडला. तसेच 2014 मध्ये भाजपने भरपूर आश्वासने दिली होती. मात्र अंमलबजावणी न करता केवळ खोटी आश्वासनेच राहिली. त्याचप्रमाणे भाजप आताही अनेक जाहीरनामे प्रसिद्ध करत आहे. जनतेला वळवण्यासाठी भाजपने दिलेली ही सगळी नाटकीय पोकळ आश्वासने आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Tags: