क्षुल्लक कारणावरून महिलेने चाकूने भोसकून एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना बेळगावात घडली आहे.
शहरातील जुन्या पीबी रोडवरील कीर्ती हॉटेलजवळ रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली असून नागराज भीमसी रागीपाटील (वय 28, रा. तारिहाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दारूच्या नशेत चाकू घेऊन जाणाऱ्या महिलेची विचारपूस केल्यावर तिने दुचाकीवरून आलेल्या या तरुणाला चाकूने भोसकले. अति रक्तस्त्रावामुळे जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर उपचार निष्फळ ठरल्याने तरुणाचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृत तरुणाचा भाऊ मलगौडा रागीपाटील याने याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मृत नागराज व्यवसायाने गवंडी असून शनिवारीच तो गावच्या जत्रेसाठी कऱ्हाडहून गावी तारिहाळला आला होता. रविवारी कपडे खरेदी करण्यासाठी तो बेळगावला आला होता. त्याचा खून झाल्याची माहिती आम्हाला रात्री 11.30च्या सुमारास आम्हाला समजली. रविवारी सकाळी मी लवकर घराबाहेर पडलो, त्यावेळी तो अजून उठला नव्हता. त्याचवेळी त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले. काही चूक नसताना हकनाक त्याचा खून करण्यात आलाय. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मलगौडाने केली.
मृत नागराज आपला मित्र नागेंद्र कुकडोळी यांच्यासमवेत कपडे खरेदी करण्यासाठी बेळगावला आला होता. खुनावेळी ते दोघे एकत्रच होते. घटनेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना नागेंद्रने सांगितले की, गावच्या रामेश्वर देवाची यात्रा असल्याने आम्ही दोघे दुचाकीवरून कपडे व चप्पल खरेदी करण्यासाठी बेळगावला आलो होतो. रात्री 10.30च्या सुमारास आम्ही कीर्ती हॉटेलजवळून दुचाकीवरून निघालो. इतक्यात दारूच्या नशेत तर्रर्र झालेली एक महिला तेथे आली आणि तिने आमच्याकडे माझा मोबाईल द्या म्हणून आरडाओरड सुरु केली. आम्हाला तिची ओळखपाळखही नव्हती. त्यामुळे आम्ही कधी तुझा मोबाईल घेतला? असा प्रश्न मी केला. इतक्यात नागराज दुचाकीवरून उतरला. त्यानेही त्या महिलेला तू कोण?, कुठली, आम्ही तुला ओळखत नाही, तुझा मोबाईल कधी घेतला? असे प्रश्न केले. इतक्यात त्या महिलेने साडीआडून चाकू काढून नागराजच्या छातीवर वार केले. एवढ्यात तेथे गर्दी जमली. पोलिसांनी त्या महिलेला पकडले. दरम्यान आम्ही नागराजला घेऊन जिल्हा इस्पितळात आलो. तेथे अति रक्तस्त्रावामुळे उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. मारेकरी महिलेला कठोर शिक्षा अशी मागणी नागेंद्रने केली.
दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या मार्केट पोलिसांनी हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतले. जयश्री पवन पवार असे आरोपी महिलेचे नाव असून ती कंग्राळी के. एच. गावातील असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अशा विचित्र घटनेत एका उमद्या तरुणाचा मृत्यू झाल्याने तारिहाळ गावावर शोककळा पसरली आहे.
Recent Comments