वचन हा केवळ शब्द किंवा साहित्य प्रकार नाही. ते सामाजिक, धार्मिक चळवळीचे माध्यम आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक डॉ. वीरण्णा राजूर यांनी सांगितले.

जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव सेना जिल्हा शाखेच्या संयुक्त विद्यमाने येथील शिवबसवनगर येथील प्रभुदेव सभागृहात बसव जयंतीनिमित्त आयोजित बसवतत्व मेळाव्यात ते व्याख्यान देताना बोलत होते.
डॉ. राजूर पुढे म्हणाले की, बाराव्या शतकात कर्नाटकातील कल्याणमध्ये मानवमुक्तीची क्रांती झाली. समानतेसह एक सुंदर समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने ही जगातील पहिली सामाजिक-धार्मिक सर्वसमावेशक क्रांती होती. त्यासाठीचे माध्यम म्हणजे वचन साहित्य. समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या पायावर एक सुंदर समाज निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे,असे ते म्हणाले. फक्त बोलणे व्यर्थ आहे. वचनांचा सार असा आहे की शब्दांना किंमत असेल तर ते कृतीत आले पाहिजेत.

यावेळी कर्नाटक सरकारकडून ‘बसवश्री’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. वीरण्णा राजूर यांचा सत्कार करण्यात आला.
साहित्यिक डॉ. बसवराज जगजंपी यांनी डॉ. वीरण्णा राजूर यांच्या अभिनंदनपर भाषण केले. निवृत्त आयएएस अधिकारी, जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ. शिवानंद जामदार यांनीही विचार मांडले. शेगुणसी विरक्त मठाचे श्री महांत महास्वामी, नागनूर मठाचे श्री डॉ. अल्लमप्रभू महास्वामी, राष्ट्रीय बसव सेनेचे अध्यक्ष शंकर गुडस व्यासपीठावर उपस्थित होते.
निवृत्त प्राचार्य डॉ. सी. के. नावलगी यांनी ओळख करून दिली. नयना गिरीगौडर व सहकाऱ्यांनी प्रार्थना सादर केली. मुरगेप्पा बाली यांनी स्वागत केले. लिंगायत महासभा शहर शाखेचे अध्यक्ष एस.जी. सिदनाळ यांनी आभार मानले. जिल्हा सचिव अशोक मळगली यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments