अरभावी मतदारसंघात लोकांनी मला निवडून देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. जी काही कामे शिल्लक आहेत ती निवडून आल्यावर करेन असा आत्मविश्वास केएमएफचे अध्यक्ष आणि अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. भालचंद्र जारकीहोळी म्हणाले की, मतदारसंघातील हालूमत समाजाच्या लोकांनी आज बैठक घेऊन भाजपला म्हणजेच मला पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. काही दिवसांपासून याबाबत तयारी सुरु होती. आपसातील सर्व मतभेद विसरून भाजपसोबत जाण्याचे या समाजाने ठरविले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो असे ते म्हणाले. आम्ही कसल्या शपथा घेतल्या नाहीत किंवा कोणाला दिल्या नाहीत. तिकीट न मिळाल्याने काँग्रेसमध्ये तीन इच्छुकांमध्ये धुसफूस सुरु आहे. घेतलेल्या शपथा मोडून ते पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम करत आहेत. तिकीट न मिळाल्याने काहीजणांना पोटदुखी सुरु झाली आहे. नैराश्यातून ते अफवा पसरवत आहेत. अपप्रचार करत आहेत. पण आईवडील, देव आणि जनतेच्या आशीर्वादाने आमचा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले.
दहा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी लवकरच बैलहोंगलमध्ये प्रचाराला येणार आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 120 ते 130 कमळं नक्की फुलवू असे म्हटले आहे. भाजप पुन्हा एकदा राज्यात बहुमत मिळवून सहजपणे सत्तेत येईल असा दावा भालचंद्र जारकीहोळी यांनी केला. गोकाकमध्ये प्रचारासाठी जाण्याबाबत बंधू रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यावर त्यांनी ये म्हटल्यास तेथे जाईन असे ते म्हणाले. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, त्यांच्यासह 50 भाजप नेत्यांवर तपास यंत्रणांद्वारे छापे टाकून बदनाम करण्याचा डाव रचल्याचा आरोप केलाय. त्यावर प्रतिक्रिया देताना, त्या कोणत्या आधारे असे बोलल्या हे माहित नाही, पण एकदम एवढ्या लोकांवर, असे छापे टाकता येत नाहीत अशी प्रतिक्रिया भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली
एकंदर, अरभावी हा आपला बालेकिल्ला अढळ आहे, तेथे आपला विजयाचा मार्ग सुकर आहे असा विश्वास भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments