Belagavi

माझ्यासह 50 काँग्रेस उमेदवारांवर छापे टाकण्याचा भाजपचा डाव

Share

विधानसभा निवडणुकीला अवघे 10 दिवस शिल्लक असताना भाजप ने माझ्यासह सुमारे 50 काँग्रेस उमेदवार आणि नातेवाईकांच्या घरांवर तपास यंत्रणांनी छापे टाकण्याचा डाव रचल्याचा आरोप बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.
रविवारी शहरात पत्रकार परिषदेत बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, जनमत काँग्रेसच्या बाजूने असल्याने नैराश्यातून भाजप कट रचतो आहे. भाजपने नैराश्यातून वाममार्ग स्वीकारल्याच्या बातम्या आहेत. बेळगावात माेठ्या तिघांसह काँग्रेसचे सुमारे पन्नास उमेदवार आणि त्यांच्या नातेवाइकांवर लोकायुक्त आणि आयटी छापे टाकणार असल्याचे संकेत आम्हाला मिळाले आहेत.

ठिकठिकाणी आम्हाला माहिती देणारे, काँग्रेसचे शुभचिंतक आहेत. त्यांच्याकडून आम्हाला याची माहिती मिळाली आहे. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. निवडणूक अवघ्या 10 दिवसांवर आली आहे. एवढा वेळ कमी असताना भाजप नेते आमच्याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणतीही निवडणूक आली की विरोधी पक्षाचे आणि मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याची सवय असते. वेळ खूप महत्वाची आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने असा मार्ग सोडावा. मी प्रदेश काँग्रेसची प्रवक्ता आहे. माझ्यासह जवळपास 50 जणांवर तपास यंत्रणांकडून छापे टाकण्यात येणार असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातील जनता मला विजयी करायचे की पराभूत याचा निर्णय घेईल. कार्यकर्ते हा गोंधळ दूर करतील. पण याचा माझ्या मतदारसंघावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास आ. हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

यावेळी कर्नाटकात सर्वत्र काँग्रेस समर्थक लाट असल्याचे जनतेतून ऐकायला मिळत आहे. राज्यातील मतदारांनी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे. बेळगाव जिल्ह्यातही चांगले वातावरण आहे. गृहज्योती, गृहलक्ष्मी, तरुणांसाठी बेरोजगार भत्ता, रेशनवर 10 किलो तांदूळ यासारख्या काँग्रेसच्या हमीपत्रांमुळे काँग्रेसने आणलेल्या हमी योजनेतून लोकांना आशा निर्माण झाली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा लोकप्रिय वचननामा असल्याचे आ. हेब्बाळकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, प्रत्येक राज्यातील निवडणुकीदरम्यान तपास यंत्रणांचा गैरवापर करणे हे भाजपचे तंत्र आहे. लोकशाहीत उमेदवार जनतेने निवडला पाहिजे. ते सोडून वाममार्गाला लागणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

Tags: