समताधारित समाजाची संकल्पना मांडणारे विश्वगुरू जगद्ज्योती बसवेश्वर यांच्या ८९० व्या जयंतीनिमित्त बेळगावात आज विविध लिंगायत संघटनांतर्फे भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली.
जागतिक लिंगायत महासभा, राष्ट्रीय बसव सेना यांच्यावतीने सर्व लिंगायत संघटनांच्या वतीने बेळगावात बसव जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. गदगच्या डंबळ तोंटदार्य मठाचे तोंटद डॉ. सिद्दराम स्वामीजी, नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी, शेगुणसी विरक्तमठाचे डॉ. महांत महास्वामीजी, कडोली दूरदुन्डेश्वर मठाचे बसवलिंग स्वामीजी यांच्या सानिध्यात जागतिक लिंगायत महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शिवानंद जामदार यांच्याहस्ते मिरवणुकीचे उदघाटन करण्यात आले. सजवलेल्या वाहनांवर बसवण्णा यांचे भव्य छायाचित्र, पुतळा, आणि त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित देखावे या चित्ररथ मिरवणुकीत सादर करण्यात आले. फ्लो
यासंदर्भात बोलताना जागतिक लिंगायत महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शिवानंद जामदार यांनी, सध्या विधानसभा निवडणूक लढवीत असलेल्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरु असून लिंगायत समाजाचे संघटन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी सांगितले की, बसव जयंतीनिमित्त आम्ही अनेक उपक्रम आयोजित केले आहेत. त्यात सर्वच लिंगायतांना भाग घेता येत नाही. म्हणून आज बसवण्णा यांच्या जीवनावर आधारित देखावे, प्रसंग दर्शविणाऱ्या चित्ररथाची भव्य मिरवणूक आयोजित केली आहे.

महांत भवनापासून सुरू झालेली चित्ररथ मिरवणूक डबल रोडसह विविध मार्गांवरून फिरून एस. जी. बाळेकुंद्री कॉलेजच्या आवारात समाप्त झाली. यावेळी लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments