एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गांधी कुटुंबाच्या सल्ल्यावरून विधाने करत सुटले आहेत. पंतप्रधान मोदींबद्दल त्यांनी केलेले विधान अयोग्य आणि निषेधार्ह असून, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप राज्य प्रवक्ता ऍड. एम. बी. जिरली यांनी केली.
बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना एम. बी. जिरली म्हणाले की, देशात दोनवेळा जनतेने मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला बहुमताने निवडून दिले आहे. अशा स्थितीत खर्गे यांनी मोदींना विषारी साप असे संबोधने म्हणजे देशातील एक कोटी ३० लाख लोकांचा अपमान आहे. भाजपच्या यशामुळे काँग्रेस हैराण झाली आहे. विशेषतः राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसला नैराश्याने ग्रासले आहे. ते बॅकफुटवर आले आहेत. त्यातूनच खर्गे यांनी हे लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवून हे वक्तव्य केले आहे. ते निषेधार्ह आहे. त्यामुळे खर्गे यांनी मोदींची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
वरुणा मतदार संघात सिद्दरामय्या यांच्या विरोधात लढणारे भाजप उमेदवार व्ही. सोमण्णा यांच्या कार्यकर्त्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करत केलेला हल्ला भ्याड आणि निषेधार्ह असल्याचे जिरली यांनी सांगितले. या हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर इस्पितळात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो असे ते म्हणाले. सिद्दरामय्या यांनी नुकतेच बोम्मई यांच्यावर टीका करताना सगळेच लिंगायत मुख्यमंत्री भ्रष्ट असल्याचे सांगत समाजविरोधात टिप्पणी केली. त्यांचे वक्तव्यही निषेधार्ह आहे. पण त्यानंतर त्यांनी आपण असे बोललोच नाही असा पवित्रा घेतला आहे. हे सगळे चुकीचे आहे. गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहून ते सांगतील तसे बोलण्याची सवय खर्गे, सिद्दरामय्यांना लागल्याची टीका जिरली यांनी केली.
यावेळी भाजप महानगर अध्यक्ष आ. अनिल बेनके, विजय कोडगनूर, प्रसारमाध्यम समन्वयक शरद पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments