कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यास देशात दंगली भडकतील, असे वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.

चिक्कोडीत आरडी कॉलेजच्या मैदानावर आयोजित काँग्रेसच्या भव्य प्रचार सभेला त्यांनी संबोधित केले. काही दिवसांपूर्वीच जबाबदार पदावर असलेले गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास देशात दंगली होतील, असे वक्तव्य केले होते. हा कर्नाटकातील जनतेचा अपमान आहे. त्यामुळे याविरोधात मी न्यायालयात जाणार आहे.73 वर्षे काँग्रेसची सत्ता असताना देशात कधी दंगल झाली का, असा सवाल त्यांनी केला.
उलट देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप खर्गे यांनी भाजपवर केला. कर्नाटकात सरकार आल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज, महिलांना 24 हजार, तरूणांना 36 हजार आणि डिप्लोमाधारकांना 18 हजार आणि प्रत्येक कुटुंबाला 10 ग्रॅम तांदूळ देणार आहोत. राज्यात एकत्र काम केल्यास, काँग्रेसचे सरकार 150 जागांवर सत्तेवर येईल असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसने 70 वर्षात काय केले? असा प्रश्न करणाऱ्या भाजप नेत्यांनी डोळे उघडून पहावे. देशात मोठी मोठी धरणे, महाविद्यालये, विमानतळ, लोकांना रेशनची तरतूद अशा अनेक गोष्टी काँग्रेसने केल्या आहेत. 16% साक्षरता असलेल्या देशात कॉंग्रेसने ती 70% पर्यंत आणली. काँग्रेसने शाळा सुरू केल्या म्हणून अमित शहा , मोदी साक्षर झाले असे ते म्हणाले.
यावेळी गणेश हुक्केरी, काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, अनिल पाटील, रवींद्र मिरजे, महावीर मोहिते, ए. बी. पाटील, विष्णुवर्धन, मोहन जोशी, श्याम घाटगे, अण्णासाहेब हावळे, श्याम रेवडे, सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.


Recent Comments