election

मोदी सरकार करतेय मोजक्या अब्जाधीश उद्योगपतींसाठी काम : राहुल गांधी

Share

मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकार देशवासियांसाठी नव्हे तर मोजक्या दोन-तीन बड्या अब्जाधीश उद्योगपतींसाठी काम करत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गमध्ये राहुल गांधी यांनी भव्य जाहीर सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारची कामगिरी, वाढती महागाई आदी अनेक मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन मोदी सरकार भाजपवर हल्लाबोल केला.

राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना आनंद जगताप व अन्य शेतकऱ्यांनी, महिलांनी देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे जीणे कठीण झाल्याची तक्रार केली. काँग्रेस सत्तेत असताना महागाई आटोक्यात होती. दरवाढ मोठ्या प्रमाणात होत नव्हती. इंधनाचे, स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर कमी होते असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकारने गवगवा करून जारी केलेला जीएसटी वास्तवात त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणला आहे. श्रीमंतांना अत्याधिक श्रीमंत करण्यासाठी जीएसटी आणला गेला. त्यामुळे देशातील गोरगरीब आणि शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वप्रथम भूमिपुत्र शेतकऱ्याला मोदी सरकारने जीएसटीच्या रूपात टॅक्स लावला. जीएसटीची संरचना गुंतागुंतीची आहे. छोट्या व्यापारी, व्यावसायिकांकडे अकाउंटंट नसतात. त्यामुळे देशातील छोटे व्यवसाय बंद पडत आहेत. त्यामुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक आणि त्यांची कुटुंबे रस्त्यावर आली आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. केंद्रात काँग्रेस सरकार आल्यास जीएसटी संरचना आणि पाच प्रकारचे कर बदलू असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरेल 140 डॉलर असतानाही पेट्रोलचा दर प्रतिलिटर 60 रुपये होता. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे प्रति बॅरेल दर कमी होऊनदेखील पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. गॅसचे दर वाढले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर दररोज वाढत आहेत. याचे कारण मोदी सरकार दोनतीन अब्जाधीश उद्योगपतींसाठी काम करत आहे. सर्व पैसा या उद्योगपतींच्या खिशात जात आहे. सत्तेत असल्यामुळे मनमानी करत ते कर आकारत आहेत. उद्योगपती मित्रांना ते जेवढी मदत करत आहेत तेवढे अधिक नुकसान सामान्य देशवासीयांचे होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

यावेळी काँग्रेस सरचिटणीस व राज्य प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला, विश्वनाथन, केपीसीसी राज्य उपाध्यक्ष माजी खा. व्ही. एस. उग्रप्पा, एआयसीसी सरचिटणीस विश्वनाथन व केतन चव्हाण आदी उपस्थित होते.

Tags: