Belagavi

काँग्रेसचे बंडखोर अजीम पटवेगार यांची माघार; राजू सेठ यांना दिला पाठिंबा

Share

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अजीम पटवेगार यांनी बेळगाव उत्तर मतदार संघाच्या निवडणूक रिंगणामधून माघार घेतली आहे. केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी समजूत काढल्यावर पटवेगार यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेत राजू सेठ याना पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसने बेळगाव उत्तर मतदारसंघात महानगर काँग्रेसचे व अंजुमन संस्थेचे अध्यक्ष आसिफ उर्फ राजू सेठ यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे असंतुष्ट झालेल्या अजीम पटवेगार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. काही मतभेदांमुळे पटवेगार यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता पसरली होती. त्यानंतर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पटवेगार व संबंधितांची बैठक घेऊन चर्चा केली. ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देऊन राजू सेठ यांनाही त्यांच्याशी चर्चा करण्याची सूचना दिली. तसेच पटवेगार यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अजीम पटवेगार यांनी काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या उपस्थितीत आज आपला अर्ज मागे घेतला.


यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना अजीम पटवेगार म्हणाले की, सतीश जारकीहोळी यांनी आमची बैठक घेऊन समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्याची सूचना राजू सेठ यांना केली. तसेच तुमची जी काही कामे असतील ती करण्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार राजू सेठ यांनीदेखील जमातीमध्ये येऊन चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मी आज अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेस भरघोस मतांनी विजयी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.

यावेळी बोलताना काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी सांगितले की, बेळगाव उत्तर मतदार संघात काँग्रेसने प्रबळ उमेदवार दिला आहे. अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. मात्र कोणातरी एकालाच तिकीट देता येते. त्यामुळे राजू सेठ यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यानंतर अजीम पटवेगार यांनी बंडखोरी केली होती. पण काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करून समजूत घातल्यावर त्यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेतला आहे असे ते म्हणाले. यमकनमर्डी मतदार संघात मतदारांचा काँग्रेसला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. एसटी उमेदवारांसाठी हा मतदारसंग राखीव असल्याने सर्वच उमेदवार एसटी समाजाचे आहेत. भाजपने एसटी समाजातील अभिनेता किच्च सुदीप यांना स्टार प्रचारक म्हणून यमकनमर्डीत उतरवले तरी, जनसमर्थन काँग्रेसला असल्याने त्याचा काही फरक पडणार नाही असा विश्वास राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप एम. जे., नगरसेवक बाबाजान मतवाले, रियाज किल्लेदार, नासिर पठाण, नझीर पटवेगार, ऐजाज हकीम आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: