Belagavi

उत्तरमधील उपनगरी भागात रवी पाटील यांचा जोरदार प्रचार

Share

हर हर मोदी, हर घर मोदी अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी बेळगावात आज उपनगरी भागात उत्तरचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारासाठी संपर्क मोहीम राबवली. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून देऊन सेवेची संधी देण्याचे आवाहन डॉ. रवी पाटील यांनी यावेळी मतदारांना केले.

बेळगावातील हनुमान नगर, टीव्ही सेंटर, जाधवनगर, सदाशिवनगर आदी भागात रविवारच्या सुटीची पर्वणी साधत भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी प्रचारमोहीम राबवली. महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन, भाजप महानगर सरचिटणीस मुरुगेंद्रगौडा पाटील, नगरसेवक संदीप जिरग्याळ आदींच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत हनुमान नगर, जाधवनगर, टीव्ही सेंटर, कुवेम्पू नगर, सदाशिव नगर आदी उपनगरी भागात प्रचार मोहीम राबवली. यावेळी त्यांनी घरोघरी संपर्क साधून मतदारांच्या थेट गाठीभेटी घेतल्या. बेळगावच्या संपूर्ण विकासासाठी केंद्रात व राज्यात मोदी आणि बोम्मई यांनी केलेल्या विकासकामांना लक्षात घेऊन आपणाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले. यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, डॉ. रवी पाटील यांचा विजय असो आदी घोषणा दिल्या. अनेक घरात रवी पाटील व भाजप नेत्यांचे महिलांनी आरती ओवाळून स्वागत केले.

यावेळी ‘आपली मराठी’सोबत बोलताना भाजप उमेदवार रवी पाटील म्हणाले की, मतदारांना थेट भेटण्यासाठी घरोघरी संपर्क व प्रचार मोहीम राबवली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत उत्तर मतदारसंघात मतदारांची भेट घेऊन प्रचार करत आहे. लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा, सहकार्य मिळत आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. जनतेची सेवा करण्यासाठी तसेच बेळगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन करत आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना डॉ. रवी पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी सांगितले की, घरोघरी प्रचारावर आम्ही भर दिला असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज जाधवनगर, हनुमाननगर, सदाशिवनगर, टीव्ही सेंटर कुवेम्पूनगर आदी भागात प्रचार केला. मोदी आणि बोम्मई यांनी केलेला विकास पाहून भाजपला निवडून देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रचारातील अनुभव कथन करताना भाजप कार्यकर्त्या सरिता श्रेयकर आणि सविता हेब्बार यांनी सांगितले की, डॉ. रवी पाटील या सच्च्या कार्यकर्त्याला भाजपने उत्तरमधून उमेदवारी दिल्याने मतदार व कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. आज उपनगरी भागात आम्ही प्रचार केला असून, लोकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. डॉ. रवी पाटील प्रचंड बहुमतांनी निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे.

एकंदर, रविवारच्या सुटीची पर्वणी साधत उत्तर मतदार संघातील उपनगरी भागात प्रचार मोहीम राबवून भाजप उमेदवार यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. मतदारांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Tags: