संपूर्ण जगाला मानवतेचा, समतेचा संदेश आणि लोकशाही व्यवस्थेची देणगी देणारे विश्वगुरू बसवण्णा यांच्या जयंती उत्सवाला बेळगावात आज भक्तिभावाने उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
बेळगाव जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, कन्नड व संस्कृती खाते आणि मध्यवर्ती बसवेश्वर जयंती उत्सव मंडळातर्फे संयुक्तपणे बेळगावातील शहापूर गोवावेस येथील बसवेश्वर चौकातील बसवेश्वर उद्यानात बसवजयंती साजरी करण्यात आली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी के. टी. शांतला, बेळगाव महापालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री, मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, वीरशैव लिंगायत महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद आदी मान्यवरांच्या हस्ते विश्वगुरू बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवाला नमन करण्यात आले.
यावेळी बोलताना वीरशैव लिंगायत महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांनी सांगितले की, बेळगावात आज आम्ही जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, कन्नड व संस्कृती खाते आणि मध्यवर्ती बसवेश्वर जयंती उत्सव मंडळ आणि लिंगायत संघटनांतर्फे संयुक्तपणे बसवेश्वर जयंती साजरी केली आहे. यंदा निवडणूक आचारसंहिता असल्याने येथे जाहीर कार्यक्रम घेतलेला नाही. पण चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दुपारी चार वाजता चन्नम्मा चौकातून बसव जयंतीची भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यात सर्व लिंगायत संघटना पदाधिकारी, समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणूक यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर भाजपचे उत्तरमधील उमेदवार डॉ रवी पाटील, आम आदमी पक्षाचे उत्तरमधील उमेदवार राजू टोपन्नावर यांनी बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार अनिल बेनके, बसवराज रोट्टी, माजी नगरसेवक रमेश कळसन्नावर, गुरुदेव पाटील, महादेव तळवार, ज्योती बदामी यांच्यासह लिंगायत समाजाचे अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.


Recent Comments