मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज बेळगावसह जिल्ह्यात श्रद्धा-भक्तीने सामूहिक नमाज पठण करून साजरी करण्यात आली.
रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांनी कडक उपवास करून व तरावी नमाज पडून रमजान महिन्याचे गांभीर्याने पालन केले. काल, शुक्रवारी संध्याकाळी चांद दिसल्याने दुसऱ्या दिवशी आज शनिवारी ईद-उल-फित्र साजरी करण्यात आली. आज सकाळी बेळगावातील अंजुमन ईदगाह मैदानामध्ये सर्व मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण केले. गेल्या दोन वर्षांपासून कोविडच्या नियमांमुळे सरकारी नियमांच्या चौकटीत राहून साध्या पद्धतीने रमजान साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी कसली बंधने नसल्याने लोकांनी अत्यंत उत्साह, जल्लोषात हा सण साजरा केला.
यावेळी मुफ्ती अब्दुल अजीज यांनी, बेळगावच्या सर्व लोकांना रमजान सणाच्या शुभेच्छा देऊन रमजानचे महत्व सांगितले. इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा धर्म असून सर्वानी एकमेकांशी, सर्व धर्मीयांशी बंधुभावाने राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार फिरोज सेठ यांनी सर्वाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. गेला महिनाभर मुस्लिम बांधवानी कडक उपवास करून अल्लाहची प्रार्थना केली. अगदी 6 वर्षांच्या मुलांनीही रोजे पाळल्याचे आपण पाहिले आहे. रमजानचा महिना म्हणजे चुकांबद्दल देवाची माफी, आशीर्वाद मागून, मोह, इच्छांवर नियंत्रण मिळवण्याचा महिना आहे. देवाने इतके सुंदर जग, निसर्ग मानवासाठी निर्माण केला आहे. त्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जरी वेगवेगळ्या धर्माचे असलो तरी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वात आधी आपण भारतीय आहोत ही भावना जागृत करणे महत्वाचे आहे. आपली भारतीय भूमी अनेक संत-महात्म्यांची भूमी आहे. विविधतेत एकता हा या भूमीचा डीएनए आहे हे यानिमित्त लक्षात घेतले पाहिजे. काही लोक, नेते जाती-धर्म, भाषा यावरून समाजात दुही निर्माण करून आपला डाव साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा कावा ओळखून अशा लोकांपासून दूर राहून सामाजिक बांधिलकी, सौहार्द जपण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन करून फिरोज सेठ यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शहर काँग्रेसचे व अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष आसिफ उर्फ राजू सेठ यांनी, सर्वांना ईदच्या शुभेच्छा देऊन सांगितले की, सर्वभाषिक, सर्वधर्मीय एकोप्याने, सौहार्दाने एकत्र येऊन एकमेकांचे सण साजरे करतात ही बेळगावची अनोखी परंपरा आहे, ती जपली पाहिजे. बेळगावात शांतता, समृद्धी नांदावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रमजानचा महिना म्हणजे गरजू, इतरांना काही देण्याचा, त्यागाचा आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याचा महिना आहे. तो पूर्ण झाल्यावर रमजान ईद साजरी केली जाते. कोविड काळात देव आपल्यावर जणू रुसला होता. दररोज किमान 20-25 मृतदेह, शेकडोंच्या संख्येने रुग्ण आपण पाहिले. पण आता देवाने पुन्हा आमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे सलोख्याने राहून बेळगावात शांती, सुख-समृद्धी नांदावी यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू असे राजू सेठ यांनी सांगितले.
त्यानंतर सर्वानी एकमेकांना रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अंजुमन इस्लाम ईदगाह मैदानावर सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण दिसून आले. मुस्लिम समाजाचे सर्व आबालवृद्ध नवे कपडे, पारंपरिक टोप्या आणि वेशभूषा करून नमाजपठणासाठी जमले होते. उत्साहाने ओसंडून वाहणारे वातावरण यावेळी पहायला मिळाले.
Recent Comments