पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षा 2022-23 चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा 16 व्या तर बेळगाव शैक्षणिक जिल्हा 25 व्या क्रमांकावर आहे. बेळगावची प्रियंका कुलकर्णी कला शाखेतून राज्यात दुसरी आली आहे.
बहुप्रतीक्षित बारावी परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर झाला. या निकालात चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा 16 व्या तर बेळगाव शैक्षणिक जिल्हा 25 व्या क्रमांकावर आला आहे. गतवर्षी चिक्कोडीचा निकाल 68 टक्के लागला होता तो यंदा 78.76 टक्के निकाल लागला. येथे 31,551 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
गेल्या वर्षी 59.88 टक्के निकाल लागलेल्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल यंदा 73.98 टक्के लागला आहे. येथे 25,448 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
बेळगावच्या लिंगराज पीयू कॉलेजची विद्यार्थिनी प्रियंका कुलकर्णी हिने कला शाखेत 600 पैकी 592 गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. बैलहोंगल येथील शासकीय पीयू महाविद्यालयाची विद्यार्थिनी सहना कडकोळ हिने कला शाखेत 600 पैकी 591 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
दरम्यान, राज्यात दुसरी आलेल्या प्रियंका कुलकर्णी हिने आपल्या यशाचे श्रेय आपली आई दीपाली आणि वडील चिदंबर प्रभाकर कुलकर्णी यांना दिले. पदवीनंतर यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय ठेवल्याचे तिने प्रसारमाध्यमांना सांगितले. दररोज 3 ते 4 तास कठोर मेहनत घेऊन अभ्यास केला. आईवडिलांनी, शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे मला हे यश मिळाले असे तिने सांगितले. विध्यार्थ्यानी खूप ताण घेऊन अभ्यास करू नये, जितका झेपेल तितका पण एकाग्रतेने अभ्यास करावा. पालकांनीही मुलांवर दबाव आणू नये असा संदेश तिने दिला.
प्रियंकाच्या यशामुळे आई दीपाली कुलकर्णी लेकीच्या यशाने भारावून गेल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रियंकाचे प्राथमिक शिक्षण लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये झाले. लहानपणापासुनच ती अभ्यासाऊ वृत्तीची आहे. लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये प्राचार्या लक्ष्मी इंचल व शिक्षकांनी तिला अभ्यासासोबतच खेळ, संगीत, विविध फेस्टिव्हल अशा सर्व उपक्रमांत प्रोत्साहन दिले. त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व समृद्ध झाले. नंतर पीयुसीला लिंगराज कॉलेजला प्रवेश घेतल्यावरही तिने दररोज अभ्यास करत हे यश गाठले आहे. आम्ही तिला शाखा निवडण्यास स्वातंत्र्य दिले. तिने कला शाखेला प्रवेश घेऊन आज हे यश मिळवले याचा खूप आनंद आम्हाला झालाय. पालकांनी मुलांवर मेडिकलला, इंजिनिअरिंगला जा असा दबाव आणू नये. त्यांचा इंटरेस्ट पाहून त्यांना शाखा निवडीचे स्वातंत्र्य द्यावे असा सल्ला त्यांनी दिला.
प्रियंकाच्या यशाने तिच्या आईवडील आणि आजीला खूप आनंद झाला. प्रियंकाला पेढे भरवून त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रियंकाची आई दीपाली या लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये शिक्षिका असून, वडील चिदंबर प्रभाकर कुलकर्णी हे अमृत फार्मास्युटिकल्समध्ये हेड अकाउंटंट आहेत. फ्लो
एकंदर बेळगावची कन्या प्रियंकाने बारावीत राज्यात दुसरा क्रमांक घेऊन बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Recent Comments