Banglore

ईश्वरप्पांशी चर्चा करून भ्रष्टाचाराचे वावडं नसल्याचं मोदींनी दाखवलं : सुरजेवाला

Share

‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेकेदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेले माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्याशी फोनवरून चर्चा, विचारपूस करून आपल्याला भ्रष्टाचाराचे वावडं नसल्याचं दाखवून दिले आहे असा आरोप काँग्रेस राज्य प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केलाय.

बेंगळूरमधील केपीसीसी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले की, भाजप कार्यकर्ता असलेल्या ठेकेदार संतोष पाटील यांनी, ईश्वरप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामांची बिले देण्यासाठी 40% कमिशन मागितल्याने ते देता येत नसल्याने आत्महत्या करत आहे अशी डेथ नोट लिहून आत्महत्या केली होती. बेळगावला आल्यावर मोदींनी त्यांची पत्नी किंवा कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली नाही. उलट संतोष यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या ईश्वरप्पा यांनी पक्षादेश पाळून निवडणुकीतून माघार घेतली म्हणजे फार मोठं काम केलं असं समजून मोदींनी त्यांना फोन करून विचारपूस केली. याचाच अर्थ राज्यातील भाजप सरकारच्या 40% कमिशनच्या धोरणाला मोदींची फूस होती, मोदींनी आपल्याला भ्रष्टाचाराचे वावडं नसल्याचे दाखवून दिलं आहे असे म्हणावे लागेल असे सुरजेवाला म्हणाले.

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाला ईश्वरप्पा सकृतदर्शनी जबाबदार असल्यामुळेच त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. यानंतर कंत्राटदार संघटनेने थेट मोदींना पत्र लिहून राज्यातील भाजप सरकारच्या 40% कमिशनवर तक्रार केली होती. डिंगळेश्वर स्वामीजींसह अनेक स्वामीजींनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र मोदींनी अजूनपर्यंत त्यावर कार्यवाही केली नाही. याउलट या प्रकरणात डागाळलेल्या ईश्वरप्पाना फोन करून त्यांची विचारपूस करून संपूर्ण भाजप तुमच्या पाठीशी आहे असे सांगणे यातून मोदींनी पंतप्रधान कार्यालयाची बदनामी, अवमान केला आहे असा आरोप सुरजेवाला यांनी केला. भाजपच्या ऐनूर मंजुनाथ, जगदीश शेट्टर, लक्ष्मण सवदी यांच्यासह सुमारे 150हुन अधिक आजी-माजी आमदार, एमएलसी, पदाधिकाऱ्यांनी राज्यातील बोम्मई सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याचा आरोप केला आहे. भाजपचेच आमदार नेहरू ओलेकर यांनीही मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांना बोम्मई यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. याचाच अर्थ बोम्मई देखील भ्रष्टाचारात बुडाले आहेत असा आरोपही सुरजेवाला यांनी केला.

एकंदर, मोदींनी ईश्वरप्पांशी फोनवरून संपर्क साधून चर्चा केल्याचा मुद्दा राज्यात गाजत असतानाच काँग्रेसने नेमका हा मुद्दा उचलत थेट मोदींवरच शरसंधान केलं आहे.

Tags: