Belagavi

जेडीएस उमेदवार शिवानंद मुगळीहाळ यांचा अर्ज दाखल

Share

बेळगाव उत्तर मतदार संघातील जेडीएसचे अधिकृत उमेदवार, शेतकरी नेते शिवानंद मुगळीहाळ यांनी आज भव्य शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
रयत संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शेतकरी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले शेतकरी नेते शिवानंद मुगळीहाळ यांना जेडीएसने बेळगाव उत्तर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट दिले आहे. त्यामुळे आज त्यांनी आपल्या समर्थकांसह सवाद्य मिरवणूक काढून भव्य शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. धनगरी ढोल वाद्यांच्या गजरात काढलेल्या या मिरवणुकीत जेडीएसचे पक्षध्वज घेऊन कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमध्ये पक्षनेत्यांसमवेत उभे राहून शिवानंद मुगळीहाळ कार्यकर्ते व जनतेला अभिवादन करत होते.

यावेळी बोलताना शिवानंद मुगळीहाळ म्हणाले की, माझ्या कार्याची दखल घेऊन जेडीएसने बेळगाव उत्तरमधून मला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आज समर्थकांच्या भव्य ताफ्यासह मी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जात आहे. गेली सुमारे वीस वर्षे मी शेतकरी व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळेच आज मोठ्या संख्येने समर्थक, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मला निवडून जनसेवेचे संधी दिल्यास, पक्षाच्या पंचरत्न योजना समर्पकपणे राबवून जनतेला त्याचा लाभ मिळवून देईन. पक्षनेते माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जाहीर केलेल्या वृद्धापवेतन, अपंग वेतन, विधवा वेतन आदी योजनांचा लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून देईन. केवळ ६ महिन्यात यापूर्वी कोणीही केला नसेल असा बेळगाव उत्तर मतदारसंघात विकास करून दाखवेन. रस्ते, पाणी गटारी, ड्रेनेज, पथदीप आदी प्रश्न सोडवून लोकांना मूलभूत सुविधा मिळवून देईन यासाठी मला निवडून देऊन सेवा करण्याची संधी त्यांनी मतदारांना केले.

यानंतर शिवानंद मुगळीहाळ यांनी भव्य मिरवणुकीने बेळगाव महानगर पालिकेत असलेल्या उत्तर मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी मोठ्या संख्येने जेडीएस कार्यकर्ते आणि शिवानंद मुगळीहाळ यांचे समर्थक उपस्थित होते.

Tags: