भांडण सोडविण्यास गेलेल्या भाजप नेत्याची धारवाड तालुक्यातील कोटूर गावात काल रात्री उशिरा हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
भाजपचे युवा नेते आणि कोटूर ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष प्रवीण कम्मार यांची काल रात्री उशिरा हत्या करण्यात आली. राजकीय वादातून ही हत्या करण्यात आली असावी, असा संशय आहे. दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि आमदार अमृत देसाई यांनी एसडीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
भाजपच्या छावणीत प्रवीण कम्मार यांची सक्रिय नेते म्हणून ओळख होती. काल ते आ. अमृत देसाई यांच्या नामांकन अर्ज रॅलीतही सहभागी झाले होते. मात्र, रात्री कोटूर येथे झालेल्या मारामारीत हल्लेखोरांनी प्रवीण कम्मार यांच्यावर चाकूने वार करून फरार झाले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीण यांना उपचारासाठी एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांचा उपयोग न होता, प्रवीण यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि आमदार अमृत देसाई यांनी रुग्णालयात जाऊन भाजपच्या युवा नेत्याचे अंतिम दर्शन घेतले.
या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना एसपी लोकेश जगलासर यांनी सांगितले की, कोटुरमध्ये देवीच्या यात्रेवरून काल रात्री भांडण झाले. काहीजण दारूच्या नशेत धिंगाणा घालत असताना त्यांना काहींनी का धिंगाणा घालताय म्हणून विचारले असता, भांडण झाले. ते सोडविण्यासाठी प्रवीण कम्मार गेले असता, काहींनी त्यांच्यावर चाकूने वार केले.
त्यात कम्मार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांची चौकशी केली असून, अन्य तिघांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
या घटनेनंतर कोटूर गावामध्ये निरव शांतता पसरली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक लोकेश जगलासर यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच ही हत्या निवडणुकीच्या काळात घडली असून, दंगल घडू नये यासाठी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हत्येतील आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.
Recent Comments