Belagavi

न्यायालय आवारात पोस्ट कचेरीमुळे वकील-जनतेची होणार सोय : न्या. मुस्तफा हुसेन

Share

न्यायालय आवारात पोस्ट कचेरी सुरु करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ती पूर्ण झाल्यामुळे वकील आणि जनतेची चांगली सोय होणार असल्याचे मत बेळगावचे प्रधान जिल्हा व सत्र न्या. मुस्तफा हुसेन सय्यद यांनी व्यक्त केले.

बेळगावात न्यायालय आवारात सुरु करण्यात आलेल्या टपाल कचेरीचे आज उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. न्या. मुस्तफा हुसेन सय्यद पुढे म्हणाले की, बेळगावात न्यायालय परिसरात पोस्ट कचेरी सुरु करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती सुरु करण्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर करून हायकोर्टाकडे पाठपुरावा केल्यावर हायकोर्टाने पोस्ट कचेरी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता न्यायाधिकरण खात्याला, वकिलांना आणि जनतेला फायदा होणार आहे. यापूर्वी पोस्ट ऑफिस नसल्यामुळे या सर्वाना दूरवरची पोस्ट कचेरी गाठून रजिस्टर पोस्ट व इतर सेवा मिळवताना धावपळ करावी लागे. आता ही अडचण दूर होऊन पोस्टाच्या सुविधा वेळेत आणि जवळ मिळणार आहेत. पोस्ट खातेही सेवा देण्यास तयार आहे. त्यांना काही अडचणी आल्यास त्या त्वरित दूर करून देऊ, असे आश्वासन प्रधान जिल्हा व सत्र न्या. मुस्तफा हुसेन सय्यद यांनी दिले.

यावेळी पोस्ट खात्याचे जिल्हा अधीक्षक विजय नरसिंह म्हणाले की, पोस्ट खाते 170 वर्षे जुने आहे. कालानुरूप नवनवीन तंत्रज्ञान अवलंबून आम्ही सर्व प्रकारच्या सेवा जनतेला देत आहोत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म खात्याने सुरु केला आहे. आणखी नवीन सेवांची मागणी केल्यास त्यादेखील खात्यातर्फे देण्यात येतील. जनतेला अधिकाधिक तत्पर सेवा देऊ असे त्यांनी सांगितले.

यावेळी न्या. मुस्तफा हुसेन सय्यद यांनी फीत सोडून नव्या पोस्ट कचेरीचे उदघाटन केले. यावेळी कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी, सचिव ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. सचिन शिवण्णावर, ऍड. जी. एन. पाटील, ऍड. अण्णासाहेब घोरपडे, ऍड. जाफर म्यागेरी, एम. एम. सय्यद आदी उपस्थित होते.

Tags: