Belagavi

सर्वांच्या सहकार्याने 20 ते 30 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होऊ : डॉ. रवी पाटील

Share

सर्वांच्या सहकार्याने 20 ते 30 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होऊ
उत्तरचे भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांना विश्वास
निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला उमेदवारी अर्ज

भारतीय जनता पक्षाचे बेळगाव उत्तर मतदार संघातील अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. रवी पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. पक्षनेतृत्वाने ज्या विश्वासाने उमेदवारी दिली आहे तो सार्थ ठरवून सर्वांच्या सहकार्याने किमान 20 ते 30 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपने विद्यमान आमदार अनिल बेनके यांना वगळून डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे बेनके व त्यांच्या समर्थकांची पुढील भूमिका काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र पक्षनेतृत्वानं समजूत घालून त्यांची नाराजी दूर केल्यानंतर आ. बेनके यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन डॉ. रवी पाटील यांच्या विजयासाठी परिश्रम घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुपारी रवी पाटील यांनी खा. मंगल अंगडी आणि कार्यकर्त्यांसह महानगर पालिकेत जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवडणूक अर्ज दाखल केला.

फ्लो
अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. रवी पाटील यांनी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षनेतृत्वाचे आभार मानले. त्याचप्रमाणे जिंकून येण्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केली. विद्यमान आमदार अनिल बेनके याना पक्षाने तिकीट दिले नाही यावर प्रतिक्रिया विचारली असता, पक्षाचा निर्णय सर्वानी पाळावा लागतो. आ. अनिल बेनके माझे चांगले मित्र आहेत. गेली १७ वर्षे आम्ही दोघे भाजपसाठी मिळून मिसळून काम करत आहोत. ते आमच्या परिवारातीलच आहे. त्यांच्याशी वेगळी अशी चर्चा झालेली नाही. पण आमची भेट होत असते. पक्षाच्या विजयासाठी नाराजी झटकून काम करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे असे ते म्हणाले.

प्रचारातील मुद्दे आणि आपले विकासाचे व्हिजन याविषयी माहिती देताना डॉ. रवी पाटील म्हणाले, बेळगावची पाणी समस्या गंभीर आहे. ती सोडविण्याला माझे प्राधान्य असेल. बेळगावची वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रस्ते, रेल्वे, हवाईसेवा यात सुधारणा करणे, शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन, उद्योग, हॉटेल, पर्यटन, परिवहन आदी क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीवर भर देणे, प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे, तसेच बेळगाव जिल्हा इस्पितळाच्या विकास करून गोरगरिबांना अधिकाधिक स्वस्त, सहजसोप्या पद्धतीने आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहील. मराठी-कन्नड या संवादाच्या भाषा आहेत.

इतकी वर्षे दोन्ही भाषिक गुण्यागोविंदाने बेळगावात रहात आहेत. आता कसला प्रश्न येणार नाही, मी कधीही मराठी-कन्नड भाषिक असा भेद केलेला नाही अन कोणीही माझ्याबाबतीत देखील असा भेद केला नाही. सर्वाना सोबत घेऊन शहराचा विकास साधने याला माझे प्राधान्य असेल असे सांगून सर्वभाषिक, सर्वधर्मीयांच्या पाठिंब्याने 20 ते 30 हजारांच्या मताधिक्क्याने उत्तर मतदारसंघातून विजयी होण्याचा विश्वास डॉ. रवी पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी खा. मंगल अंगडी, भाजप नेते ऍड. आर. एस. मुतालिक, लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांच्यासह लिंगायत नेते उपस्थित होते.

Tags: