Belagavi

बेळगाव ग्रामीणमधून भाजपचे नागेश मन्नोळकर यांचा अर्ज दाखल

Share

संभाजी चौकातून भव्य मिरवणूक काढून केले शक्तिप्रदर्शन
सर्व जाती-धर्माचे हजारो कार्यकर्ते, महिलांचा उत्साहात सहभाग

भव्य मिरवणूक, शक्तिप्रदर्शन करत नागेश मन्नोळकर यांचा अर्ज दाखल
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

होय, ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजपमधील अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने सर्वांचे लक्ष लागलेली बेळगाव ग्रामीणची उमेदवारी भाजपने नागेश मन्नोळकर यांना दिली. त्यामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना व इच्छुकांना धक्का बसला होता. मात्र नेत्यांनी समजूत काढल्याने पक्षाचा आदेश शिरसांवद्य मानून इच्छुक व कार्यकर्त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य करत नागेश मन्नोळकर यांच्या प्रचारात झोकून दिले आहे. भाजपमधील किंगमेकर नेते रमेश जारकीहोळी यांचे ते निकटवर्तीय आहेत.

त्यानंतर आज भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करत नागेश मन्नोळकर यांनी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज त्यांच्या पुतळ्याचे पूजन त्यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी नागेश मन्नोळकर आणि भारतीय जनता पक्षाच्या जयजयकार करणाऱ्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी नागेश मन्नोळकर यांच्या समवेत भाजपचे किंगमेकर नेते रमेश जारकीहोळी, महाराष्ट्राचे मंत्री व बेळगाव निवडणूक प्रभारी गिरीश महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजप ओबीसी मोर्चा राज्य सचिव किरण जाधव, महिला मोर्चा पदाधिकारी डॉ. सोनाली सरनोबत, विनय कदम आदी उपस्थित होते. फ्लो

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, पक्षाचा आदेश प्रमाण मानून नागेश मन्नोळकर यांचा अर्ज भरून उद्यापासून जाहीर प्रचाराला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी आज धर्मवीर संभाजी चौकातून भव्य मिरवणूक काढून चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरात पूजा करून देवाचे आशीर्वाद घेऊन नागेश मन्नोळकर यांचा अर्ज भरण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांचे विचार पाळणारे, हिंदुत्वाचे रक्षण करणारे सरकार येण्यासाठी मतदारांनी नागेश मन्नोळकर यांना खूप आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. बेळगाव ग्रामीण मतदार संघात काँग्रेसचा पराभव करून भाजपला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना भाजप उमेदवार नागेश मन्नोळकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने ग्रामीणमधून मोठ्या विश्वासाने मला उमेदवारी दिली आहे. मतदार संघाच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढतोय. गेल्या पाच वर्षांत ग्रामीण मतदार संघात जो विकास झाला नाही तो करून दाखवणार आहे. येत्या काळात चांगले काम करून दाखवणार आहे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, धर्मवीर संभाजी चौकातून कॉलेज रोडवरून धनगरी वाद्यांच्या तालावर सुरू झालेल्या मिरवणुकीत बेळगाव ग्रामीण मतदार संघातील विविध वयोगटातील हजारो भाजप कार्यकर्ते, नागेश मन्नोळकर यांचे चाहते, समर्थक सहभागी झाले होते. भाजपचे पक्षध्वज हाती घेऊन, गळ्यात भाजपचे शाल-उपरणे, डोक्यावर भगव्या टोप्या, फेटे घालून सर्व जाती-धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः युवक आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरात नागेश मन्नोळकर यांनी श्री गणेशाची पूजा केली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. फ्लो
यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags: