मी गेल्या पाच वर्षात बेळगाव उत्तर मतदारसंघाचा खूप विकास केला आहे. हायकमांडने सध्या डॉ. रवी पाटील यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करू, असे मत विद्यमान आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
भाजप कार्यालयात सोमवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मी कोणत्याही समाजावर अन्याय न करता, जात-पात, वर्ण, पंथ यांचा विचार न करता प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र भाजपच्या हायकमांडने या क्षेत्रात बदल केला. रवी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सर्वांनी डॉ. रवी पाटील यांना विजयी करायचे हे निश्चित झाले आहे. डॉ.अनिल बेनके हेच उमेदवार आहेत, असे माझे चाहते, भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. रवी पाटील यांना विजयासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, गेल्या चार दिवसांपासून अनिल बेनके वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र त्या सर्व खोट्या आहेत असे ते म्हणाले.
गेल्या 30 वर्षांपासून कार्यकर्त्यांना संघटित करून भाजपच्या विजयासाठी प्रयत्न केले, मात्र बेळगाव उत्तर मतदारसंघात भाजपचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. 2018 मध्ये पक्षाने माझी उमेदवार म्हणून घोषणा केली, जातीभेद विसरून बेळगाव उत्तर मतदारसंघातील जनतेने मला विजयी केले. यापूर्वी दोनदा तिकीट हुकल्यावरही मी पक्ष सोडला नाही. वैयक्तिकरित्या माझ्यावर अन्याय आहे हे खरे पण मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे.
ते म्हणाले की, मी सदैव भाजपसोबत आहे, ज्येष्ठ नेते माझ्यासोबत आहेत.आम्ही सर्व एक आहोत.
बी.एल.संतोष यांनी लोकसभेचे तिकीट देण्याचे आश्वासन दिले आहे का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, वरिष्ठांना भेटलो आहे, कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करतो.भाजप उमेदवाराच्या विजयासाठी काम करणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले. जातीच्या वादामुळे तुम्ही तिकीट गमावले या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, तसे नाही, सर्व साधक बाधक तपासून निर्णय घेतला आहे, पक्ष जो निर्णय घेतला जाईल त्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना भाजप राज्य प्रवक्ता ऍड. एम. बी. जिरली यांनी, युद्धाच्यापूर्वी अनेक वर्षे तयारी करून ऐन युद्धाच्या वेळी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना कार्यकर्ते चोख उत्तर देतील असे सांगत लक्ष्मण सवदी आणि जगदीश शेट्टर यांच्या पक्षत्यागावर प्रतिक्रिया दिली. पक्षाचे महाराष्ट्रातील नेते गिरीश महाजन निवडणूक प्रभारी म्हणून येथे आले आहेत, ते तसेच भाजप महानगर अध्यक्ष आ. अनिल बेनके व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवू. भाजप सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. कर्नाटक आणि बेळगावसाठी दोन स्वतंत्र निवडणूक जाहीरनामे प्रकाशित करण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.
बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील म्हणाले, आज दुपारी माझा व उत्तरचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरणार आहोत. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर बेळगाव तालुक्यातील बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण या तिन्ही मतदारसंघात भाजप विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला महाराष्ट्राचे मंत्री व बेळगाव निवडणूक प्रभारी गिरीश महाजन, खा. मंगल अंगडी, भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments