पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात आणि येडियुरप्पा, बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने कर्नाटकात अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासह लोक कल्याणाच्या अनेक योजना आणून लोकांचे कल्याण केले आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनता भाजपच्या बाजूने निर्णायक जनादेश देईल असा विश्वास भाजप प्रवक्ता आणि राज्यसभा सदस्य सुधांशु त्रिवेदी यांनी व्यक्त केला.
बेळगावात कोल्हापूर सर्कलमधील एम. बी. स्क्वेअर बिल्डिंगमध्ये भाजपच्या केंद्रीकृत माध्यम केंद्राचे उदघाटन केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुधांशु त्रिवेदी पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समृद्धीसाठी बेळगाव आणि राज्याने मोठे बलिदान दिले असून, देशाच्या उभारणीत या देशातील महापुरुषांचे योगदान मोठे आहे. केंद्र व राज्य सरकारने सक्षम मंत्री व मंत्रिमंडळासह शेकडो विकास प्रकल्प राबविले असून, त्यामुळे देशातील नागरिकांना सर्वच क्षेत्रात विकासाचा लाभ झाला आहे. परदेशात पंतप्रधानांचा अपमान करत काँग्रेस नेत्यांनी देशाचा अनादर केला आहे. त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगला विकास झाला आहे, तेव्हा आपण सर्वांनी भाजप पक्षासोबत वाटचाल करून विकास करूया.
लक्ष्मण सवदीसारख्या महत्त्वाच्या व्यक्ती भाजप सोडून इतर पक्षात जाण्याबाबत बोलतांना राज्यसभा सदस्य त्रिवेदी म्हणाले की, पराभूत होऊनदेखील पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले होते. भाजप आणि अन्य पक्षांत मूलभूत फरक आहे. भाजप कार्यकर्त्यांना योग्यवेळी योग्य स्थान-मान देतो. आजपर्यंत भाजप सोडून गेलेल्यांचे भले झालेले नाही असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात व पत्रकार परिषदेत केंद्रीय प्रवक्ते व नेत्यांसह प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, उत्तर मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील, जिल्हा, तालुका, मंडलस्तरीय पदाधिकारी, व नगरसेवक उपस्थित होते.


Recent Comments