Belagavi

उमेदवारी न देऊन भाजपकडून शेट्टर यांच्यावर अन्याय : प्रभाकर कोरे

Share

जगदीश शेट्टर यांना उमेदवारी न देऊन भाजपने त्यांच्यावर वैयक्तिक अन्याय केला आहे. शेट्टर यांच्या राजीनाम्याने पक्षाचे नुकसान होईल असा इशारा माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिला आहे.

उमेदवारी न मिळाल्याने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी प्रतिक्रिया दिली. जगदीश शेट्टर यांना तिकीट का दिले नाही हे मला माहित नाही. त्यांच्या राजीनाम्याने पक्षाचे नुकसान होणार आहे. आज संध्याकाळी त्यांना भेटून बोलणार आहे. शेट्टर यांना तिकीट न देऊन भाजपने लिंगायत समाजावर अन्याय केलाय असे मला वाटत नाही. लिंगायत समाज जागृत आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासून राजकारणात आहे. अन्याय केल्यास हा समाज धडा शिकवेल. जर कोणी हा समाज संपवू, तो समाज संपवू असे म्हणत असतील तर ते शक्य नाही. लिंगायतांना कोणी हलक्यावर घेऊ नये. मोदींना अंधारात ठेवून हे केले जात असावे. असे होत असेल तर ते बरोबर नाही. मला काँग्रेसकडून कोणतीही ऑफर नाही. सध्या भाजप सोडण्याचा प्रश्नच नाही. पक्षाने गुजरात मॉडेलवर तिकीट वाटप करण्याचा प्रयत्न केला आहे असे कोरे म्हणाले.

एकंदर, शेट्टर याना उमेदवारी न देता पक्षाने त्यांच्यावर अन्याय केलाय, पण लिंगायत समाजावर अन्याय केलेला नाही असे सांगतानाच अन्याय केल्यास लिंगायत समाज धडा शिकवेल असे प्रभाकर कोरे यांनी म्हटले आहे

Tags: