एकदा घर सोडून बाहेर पडल्यावर संपर्क साधला काय अन नाही काय? संपर्क साधण्यात अर्थ तरी काय आहे असे सांगत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजप सोडण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
बेळगावात सांबरा विमानतळावरून लक्ष्मण सवदी यांनी खासगी विमानाने बेंगळूरला प्रयाण केले. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, बंगळुरला जाऊन साधक-बाधक चर्चा करणार आहे, आज सायंकाळपर्यंत भाजप सोडण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा आहे, विधान परिषदेच्या जागेचा पक्षाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. अजूनही गडबड आहे, त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. मग काय करायचे ते ठरवणार आहे. काँग्रेस आणि जेडीएस दोघांकडूनही निमंत्रण आहे.

संध्याकाळी परत येतो मग काय ते सांगतो, साधारण 17 किंवा 18 एप्रिलला मी उमेदवारी अर्ज दाखल करेन.
मला मतदारसंघातील जनतेची संमती मिळाली आहे. अनेकांनी आपला निर्णय योग्य आहे असे खासगीत सांगितले आहे असे सवदी म्हणाले.
बी. एल. संतोष यांनी संपर्क साधला नाही का या प्रश्नावर बोलताना सवदी घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्याशी संपर्क साधला काय अन नाही साधला काय? पण मी त्याच्याशी संपर्क साधला, मला माफ करा म्हणालो. ते माझे गुरु आहेत. त्यांनी कठीण काळात मदत केली आहे. बी. एल. संतोष यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. काही नेत्यांनाही पाठवले होते. पण त्यांची आज्ञा पाळणे कठीण आहे, अन न पाळणेही कठीण आहे. दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना माझी वैयक्तिक काही मागणी नाही. अथणी आणि कागवाड तालुक्यातील काही भाग सिंचनापासून वंचित आहे. तेथे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे. मी सिंचनाची मागणी करणार आहे, माझी वैयक्तिक मागणी काही नाही असे सवदी म्हणाले.
एकंदर, काँग्रेस-जेडीएस दोन्हीकडून निमंत्रण आहे, सायंकाळपर्यंत विचार करून सांगतो असे म्हणत लक्ष्मण सवदी यांनी ते भाजप सोडण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट संकेत आज दिले हे खरे.


Recent Comments