बेळगाव जिल्हा प्रशासन, महानगरपालिका अन समाजकल्याण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने विविध दलित संघटनांच्या सहयोगाने बेळगावात आज निवडणूक आचारसंहितेचे पालन करत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
बेळगाव शहरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर उद्यानात जिल्हा प्रशासनातर्फे जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, एसपी संजीव पाटील यांनी प्रथम डॉ. आंबेडकर ज्योतीचे स्वागत केले. तसेच उद्यानातील आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, मनपा आयक्त रुद्रेश घाळी, विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहिता लागू असताना अत्यंत उत्साहाने जल्लोषात आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत आहे. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून सर्वांनी वाटचाल केली पाहिजे. केवळ एक दिवस जयंती साजरी करून उपयोग नाही.

त्यानंतर दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले की, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आज आम्ही डॉ. आंबेडकर जयंती साजरी करत आहोत. यानिमित्त आंबेडकर ज्योती काढण्यात आली असून धर्मवीर संभाजी चौकातून ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या अनेक भागातून हजारो लोक या मिरवणुकीत सहभागी झाले. धर्मवीर संभाजी चौकापासून प्रारंभ होऊन मिरवणूक रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, शनिवार खुट, काकतीवेस, चन्नम्मा चौक मार्गे आंबेडकर उद्यानात मिरवणुकीची सांगता होणार आहे असे सांगून आंबेडकर जयंती आणि मिरवणुकीमागचा उद्देश याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली.

त्यानंतर मिरवणूक मार्गावर अनेक दलित संघटनांनी मंडप घातले होते. तेथे मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्ररथांचे स्वागत करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांवर आधारित देखावे, फलक चित्ररथांवर सादर करण्यात आले. यावेळी बेळगाव महानगर पालिकेतर्फे शहर आणि मिरवणूक मार्गाची स्वच्छता करून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आली होती. बेळगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांतील दलित संघटना, युवक मंडळांचे कार्यकर्ते जल्लोषात चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते.


Recent Comments