पोहायला गेलेल्या चार तरुणांचा घटप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील धुपदाळजवळ घटप्रभा नदीत घडली आहे. बुडालेले सर्व तरुण पंचविशीच्या आतील आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील धुपदाळजवळ घटप्रभा नदीत काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. पोटासाठी घरगाव सोडून आलेल्या चार कोवळ्या युवकांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सर्व चारही मृत तरुण उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुंडगोड तालुक्यातील हिरीगेरे गावातील आहेत.

हे सर्व तरुण घटप्रभा येथील एका बारमध्ये काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त बार बंद असल्याने सुट्टीनिमित्त हे तरुण धुपदाळजवळ घटप्रभा नदीत पोहायला गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेत संतोष बाबू इटगी (१८), अजय बाबू जोरे (18), कृष्णा बाबू जोरे (२२) आणि आनंद कोकरे (१९) यांच्यावर काळाने घाला घातला आहे. घटप्रभा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. घटप्रभा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी इस्पितळात पाठविले. या घटनेने घटप्रभा धुपदाळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments