कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे . सर्व इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरु आहे . राष्ट्रीय पक्षांकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार पुढील रणनीती आखत आहेत तर उमेदवारी न मिळाल्याने दुखावले गेलेले इच्छुक , बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत . या सर्वांचे मतदानानंतर आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळणार आहेत .
अगदी पूर्वीपासून , मराठी आणि मराठा मतदारांचे प्राबल्य कायम ठेवून , बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निवडून यायचे . मात्र समितीतील अंतर्गत राजकारण , वर्चस्ववाद आणि मतभेदाना कंटाळून, अनेकांनी समितीचा त्याग करून वेगळी चूल मांडली आणि समितीच्या अभेद्य किल्ल्याला खिंडार पडले आणि काँग्रेस आणि भाजपचा यात शिरकावं झाला . माजी आ . रमेश कुडची १० वर्षे , फिरोज सेठ १० वर्षे , आणि अनिल बेनके यांनी ५ वर्षे अशी एकूण २५ वर्षे राष्ट्रीय पक्षाचे आमदार बेळगाव उत्तर मतदार संघात होते . . त्यामुळे समितीचा एकही उमेदवार मागील 25 वर्षात निवडून आला नाही . आता भाजपच्या तिकीट वाटपामुळे नाराज परिस्थितीचा फायदा उठवून महाराष्ट्र एकीकरण समितीला आपले स्थान पुन्हा एकदा बळकट करण्याची संधी मिळाली आहे या सर्व परिस्थीतिचे आकलन करून , महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी , अंतर्गत कलह मिटवून, सर्व मराठी भाषिकांना एकीची हाक दिली . आणि त्याप्रमाणे , २०२३ च्या विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी , निवड समितीच्या निर्णयाच्या आधारे , सीमाप्रश्नाची बांधिलकी आणि समितीशी असलेली एकनिष्ठता या आधारावर उमेदवारांची घोषणा करण्यात आली .
बेळगाव ग्रामीण मधून , आर एम चौगुले तसेच खानापूर मतदारसंघासाठी मुरलीधर पाटील हे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत . बेळगाव उत्तरसाठी ऍड . अमर येळ्ळूरकर तर , बेळगाव दक्षिण मतदार संघासाठी रमाकांत कोंडुसकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून , याबाबत अधिकृत घोषणा उद्या म्हणजेच शुक्रवारी करण्यात येणार आहे .
बेळगाव उत्तर मतदारसंघातून , मराठा समाजाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अनिल बेनके याना तिकीट वगळण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत . तर डॉ . रवी पाटील याना , बेळगाव उत्तरची उमेदवारी दिल्याने , लिंगायत समाजाचा त्यांना पाठिंबा आहे . त्याचप्रमाणे जेडीएसची उमेदवारी शिवानंद मुगलीहाळ याना देण्यात आली आहे . आता फक्त काँग्रेसची उमेदवारी जाहीर करणे बाकी आहे . बेळगाव उत्तरचे माजी आमदार फिरोज सेठ तसेच , त्याचे बंधू राजू सेठ हे देखील ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत . , मात्र राजू सेठ यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती उपलब्ध झाली असून फक्त अधिकृत जाहीर करणे बाकी आहे .
महाराष्ट्र एकीकरण समितीमधील अंतर्गत वाद वरवर मिटल्याचे दिसत असले तरी , उमेदवारी न मिळालेले इच्छुक उमेदवार , आतून , इतर गोटातल्या उमेदवारांची मदत छुप्यारितीने करण्याची शक्यता आहे . यामुळे राष्ट्रीय पक्षाना याचा फायदा होणार आहे . मात्र बेळगाव उत्तर मतदारसंघात आ . बेनकेना उमेदवारी नाकारल्याने , त्याच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून , पुढील निर्णय घेऊ असा इशारा दिला आहे . आता हे सर्मथक अन्य राष्ट्रीय पक्षाला साथ देतात कि , मराठी अस्मिता कायम राखत समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हे पाहावे लागेल .
एकंदर , भाजपने , कार्यकर्त्याना अनपेक्षित अशा उमेदवाराला तिकीट दिल्याने, बंडाळीची चिन्हे दिसू लागली आहेत . याचा फायदा काँग्रेस उठवणार कि , समिती आपला गड पुन्हा मिळवणार हे पाहावे लागेल.


Recent Comments