भाजपची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर बेळगाव उत्तरपाठोपाठ बेळगाव ग्रामीणमध्येही नाराजीनाट्य सुरु झाले आहे. भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संजय पाटील यांना वगळून नवखे नागेश मन्नोळकर यांना उमेदवारी दिल्याने पक्षाच्या विविध घटक शाखांच्या 100हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.
होय, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील बेळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना यावेळी संधी दिली नाही. त्यांच्याऐवजी माजी मंत्री व गोकाकचें आमदार रमेश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय नागेश मन्नोळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संजय पाटील यांच्या समर्थकांत व पक्ष कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. संजय पाटील यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचे संघटन मजबूत केले, पक्ष तळागाळातील समाजापर्यंत नेऊन, आमदारकीच्या काळात लोकांची, विकासाची अनेक कामे केली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारीने काम केले.

तरीही त्यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर व आमच्यावर अन्याय झाल्याची भावना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत पसरली आहे. याच नाराजीतून बेळगाव ग्रामीण मतदार संघ भाजप मंडळच्या 100हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आज सुपूर्द केले.
ग्रामीण मतदार संघातील गावनिहाय तसेच युवा मोर्चा, एससी-एसटी मोर्चा, स्लम मोर्चा आदी घटक शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात आपले राजीनामे सादर केले. येत्या 8 दिवसांत पक्षश्रेष्ठींनी आपला निर्णय बदलून, संजय पाटील यांनाच उमेदवारी जाहीर करावी अन्यथा बैठक घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी पक्षनेतृत्वाला दिला.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना यल्लाप्पा पाटील यांनी सांगितले की, मी गेल्या 18-20 वर्षांपासून भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. संजय पाटील यांनी मतदार संघात आणि जिल्ह्यात भाजप मजबूत करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. दोनवेळा आमदार म्हणूनही मतदार संघाच्या समस्या सोडवून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्त्यांनी पक्षाचा वटवृक्ष केला आहे. आज त्याकडे दुर्लक्ष करून हायकमांड पक्षाचा साधा सदस्यही नसलेल्या नवख्या व्यक्तीला उमेदवारी देते हा संजय पाटीलच नव्हे तर आम्हा कार्यकर्त्यांवरदेखील अन्याय आहे. याचा आम्ही निषेध करतो. आमच्या पदांचे राजीनामे दिले आहेत. संजय पाटील यांनी आम्हाला पक्षातच राहून पक्षासाठी काम करण्याची सूचना केली आहे. मात्र पक्षाने दिलेली उमेदवारी रद्द करून संजय पाटील यांनाच उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिला.
भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवी कोटबागी यांनी सांगितले की, भाजप हा शिस्तीचा, तत्व-सिद्धांतावर चालणार पक्ष असल्याचा गवगवा केला जातो. मात्र ग्रामीणमध्ये संजय पाटील याना उमेदवारी न देता नवख्या, पक्ष सदस्यही नसलेल्या व्यक्तीला तिकीट देऊन पक्षाने संजय पाटीलच नव्हे तर एकनिष्ठ कार्यकर्त्यांवरही अन्याय केला आहे. याचा आम्ही निषेध करतो. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा, लक्ष्मण सवदी, आमदार अनिल बेनके यांच्यासारख्या एकनिष्ठ, मेहनती नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारली. संजय पाटील यांच्यावरही अन्याय करण्यात आलाय. त्यामुळे कुठे गेली भाजपची शिस्त, तत्व-सिद्धांत असा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या 8 दिवसांत भाजपने आपला हा निर्णय बदलून संजय पाटील यांना सन्मानाने उमेदवारी जाहीर करावी अन्यथा आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून बैठक घेऊन वेगळा निर्णय घेऊ असा इशारा रवी कोटबागी यांनी दिला.
एकंदर, बेळगाव उत्तर पाठोपाठ बेळगाव ग्रामीणमध्येही भाजप कार्यकर्त्यांत संजय पाटील यांना तिकीट न दिल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. त्यातूनच पदाधिकाऱ्यांनी 100 हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी पदांचे राजीनामे देऊन भाजप श्रेष्ठींना सूचक इशारा दिलाय. त्यामुळे ग्रामीणमधील निवडणूक भाजपसाठी दिसते तितकी सोपी नाही याचे संकेत मिळाले आहेत. यावर भाजप नेतृत्व काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.


Recent Comments