Belagavi

पिरनवाडीत बिरेश्वर मंदिराचा यात्रामहोत्सव भक्तिभावाने

Share

बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी गावचे हालुमत धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरेश्वर मंदिराचा तीन दिवसीय यात्रामहोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिभावाने पार पडला.

रविवारी अभिषेक, पारंपारिक धार्मिक विधिसह पुजन, ढोलवाद्यासह सुवासिनीकडुन अंबिल कलश आणणे, राजकीय नेत्यांच्या सहभागासह रात्रभर धनगरी गाण्यांचा रात्र जागरण कार्यक्रम आणि सोमवारी भव्यदिव्य पालखी मिरवणुक व मुख्य यात्रेला सुरुवात झाली. भक्तांनी पालखीवर भंडारा, खोबरे, खारिक व लोकर जयघोषासह उधळली. भाकणुकीसह विविध पारंपारिक धार्मिक विधीसह मोठ्या श्रद्धा भक्तिभाव व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.

विधिवत पुजनासह देवाला फुल व हारानी सजवून अत्यंत आकर्षक आरासासह भव्यदिव्य मंटप, केळीची झाडं, अंबोति व विविध वस्तुसह मंदिर सजवून अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी यात्रामहोत्सवामध्ये सहभागी होऊन त्यांच्या फंडातुन बांधलेल्या समुदाय भवनाचा लोकार्पण केले. यावेळी यात्रा कमिटीच्या वतिने त्यांचा फेटा, मानाचे काळे घोंगडे व हार घालुन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवाजी शहापुरकर, पिराजी सुळगेकर, निंगाप्पा हावण्णवरसह यात्रा कमिटी पदाधिकारी, भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंतर अफजलपुर व चडचण गावांचे धनगरी गाण्यांचे कार्यक्रम, रात्रजागरण कार्यक्रमाध्ये प्रश्न, उत्तर वादविवाद, संवाद, पुरुष विरुद्ध महिला गाण्यांबरोबर नृत्य सादर करणे भाविक भक्तांचे मुख्य आकर्षण ठरले.

सोमवारी पहाटे नवस केलेल्या भाविक भक्तांचे दीड नमस्कार घालणे, नामकरण, पडलेल्या भंडाऱ्यामध्ये लोटांगण घालुन नवस फेडणे आदी कार्यक्रम झाले. बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची यांच्यातर्फे ढोल वाजवून व स्मोकिंग मशिनच्या माध्यमातून भंडारा उधळुन पालखी मिरवणुकीला चालना देण्यात आली. कुडची यांचाही यात्रा कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यात्रेसंदर्भात मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली.

मंगळवारी खानापुरच्या मलप्रभा नदीला जाऊन सर्व पूजा साहित्य विसर्जन करुन विधिवत पूजा केल्यानंतरच सर्व धार्मिक विधी व यात्रामहोत्सवाची सांगता झाली.

Tags: