विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या यादीत बेळगाव उत्तरचे विद्यमान आमदार अनिल बेनके यांना जोरदार झटका बसला सून, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. बेळगाव दक्षिणमधून विद्यमान आ. अभय पाटील यांनाच पुढे चाल देण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीणमधून रमेश जारकीहोळी यांचे समर्थक नागेश मन्नोळकर यांना तर खानापूरमधून विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जाहीर होणार होणार म्हणून गाजत असलेली भाजपची 189 उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी काल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी ही यादी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत भाजपने 52 नव्या चेहऱ्यानं संधी दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातही 2 विद्यमान आमदारांना उमेदवार यादीतून वगळण्यात आले आहे. बेळगाव उत्तरचे विद्यमान आमदार अनिल बेनके आणि रामदुर्गमधून महादेवप्पा यादवाड याना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उत्तरमधून डॉ. रवी पाटील तर रामदुर्गमधून चिक्करेवण्णा यांना तिकीट देण्यात आले आहे. बेळगाव ग्रामीणमधून रमेश जारकीहोळी यांचे समर्थक नागेश मन्नोळकर यांना तर खानापूरमधून विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी मंत्री उमेश कत्ती यांच्या कुटुंबाला भाजपने 2 ठिकाणी उमेदवारी दिली आहे. त्यांचे बंधू माजी खासदार रमेश कत्ती यांना चिक्कोडी-सदलगा मतदार संघातून तर पुत्र निखिल कत्ती यांना हुक्केरीतून उमेदवारी देण्यात आली आहे. निपाणी मतदारसंघातून विद्यमान आमदार व मंत्री शशिकला जोल्ले यांना तिकीट देण्यात आले आहे. अथणी मतदार संघात विद्यमान आमदार महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी देत त्यांना उमेदवारी मिळणार का या प्रश्नावर भाजपने पडदा टाकला आहे.
अपेक्षेप्रमाणे गोकाकमधून रमेश जारकीहोळी, अरभावीतुन भालचंद्र जारकीहोळी यांना पुढे चाल देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यमान आमदार सर्वश्री पी. राजीव (कुडची), श्रीमंत पाटील (कागवाड), दुर्योधन ऐहोळे (रायबाग), महांतेश दौड्डगौडर (कित्तूर) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यमकनमर्डी मतदार संघात केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात बसवराज उंद्री यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. बैलहोंगलमधून जगदीश मेटगुड पुहा एकदा भाजपच्या उमेदवारीवर नशीब अजमावणार आहेत.
रमेश जारकीहोळी यांच्यासमवेत ऑपरेशन कमळसाठी पक्षत्याग करून पुन्हा निवडून येऊन भाजप सरकार अस्तित्वात येण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. त्याशिवाय बेळगाव ग्रामीण मतदार संघातून आपले निकटवर्तीय नागेश मन्नोळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यात रमेश जारकीहोळी यशस्वी झाले आहेत.


Recent Comments