बेळगाव उत्तरचे विद्यमान आमदार अनिल बेनके यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याचे संतप्त पडसाद त्यांच्या समर्थकांत उमटले. मंगळवारी रात्री उमेदवारी जाहीर होताच आ. बेनके यांच्या समर्थकांनी आधी चन्नम्मा चौकात आणि नंतर खा. मंगल अंगडी यांच्या सदशिवनगरातील निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली. त्यासोबतच उत्तरमधील भाजपच्या सर्व घटक शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली भाजपची पहिली उमेदवारी यादी अखेर काल, मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. मात्र या यादीतून बेळगाव उत्तरचे विद्यमान आ. अनिल बेनके यांना वगळून डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी दिल्याचे समजताच आ. बेनके यांच्या कार्यकर्त्यांत संताप पसरला. काही मिनिटातच आ. बेनके यांच्या चव्हाट गल्लीतील कार्यालयासमोर शेकडो समर्थक जमले. नंतर त्यांनी चन्नम्मा चौक गाठून तेथे सुमारे तासभर निदर्शने केली. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

त्यानंतर बेनके यांच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव नगरातील खा. मंगल अंगडी यांच्या घरासमोर जमून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. संतप्त समर्थकांनी यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय छत्रपती शिवराय, राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, बसवण्णा आदींच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. खासदार अंगडी यावेळी निवासस्थानात उपस्थित नव्हत्या. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी बेनके समर्थकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र समर्थक कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
काही कार्यकर्त्यांनी खा. अंगडी यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता, त्यांनी कार्यकर्त्यांची नाराजी पक्ष नेतृत्वाच्या कानावर घालण्याचे आश्वासन दिले. मात्र कार्यकर्त्यांनी डॉ. रवी पाटील यांची उमेदवारी रद्द करून अनिल बेनके यांनाच उमेदवारी देण्याची मागणी लावून धरली. यावेळी बोलताना आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आ. अनिल बेनके गेली 25हुन अधिक वर्षे भाजपसाठी निष्ठेने कार्य करत आहेत. कोणताही जातीभेद, भाषाभेद न करता त्यांनी विकासकामे राबवून उत्तर मतदारसंघात भाजपला मजबूत केले आहे. त्यांना एकचवेळ संधी देऊन आता उमेदवारी नाकारणे हा त्यांच्यावरील आणि कार्यकर्त्यांवरील अन्याय आहे. रवी पाटील यांची उमेदवारी रद्द करून बेनके यांनाच जाहीर करावी, अन्यथा बेळगाव उत्तरमधील भाजपच्या सर्व घटक शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देतील असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी आ. अनिल बेनके यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments