बेळगाव जिल्ह्यात एसएसएलसी परीक्षा सुरु असताना सामूहिक कॉपी झाल्याच्या कारणावरून 26 शिक्षकांना निलंबित केल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी बेळगावात उमटले. ही कृती बेकायदा असल्याचा आरोप करून माध्यमिक सहशिक्षक संघटनेने उद्या दुपारच्या आत निलंबन मागे न घेतल्यास, संपूर्ण जिल्ह्यात एसएसएलसी परीक्षेच्या उर्वरित 2 पेपरवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनेने दिलाय.
सध्या राज्यभरात एसएसएलसी परीक्षा सुरु असून आजवर 4 विषयांचे पेपर पार पडले आहेत. याच दरम्यान काही ठिकाणी सामूहिक कॉपी झाल्यावरून परीक्षा कर्तव्यावर नेमलेल्या 26 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलेय. या निर्णयाचे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संतप्त पडसाद उमटले आहेत.

या निर्णयाच्या विरोधात शिक्षकांनी आज बेळगावातील क्लब रोडवरील डीडीपीआय कार्यालयासमोर जमून निषेध केला. कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघटनेचे सरचिटणीस रामू गुगवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत पुढील कृतीविषयी चर्चा करण्यात आली. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निर्णय एकतर्फी, अन्यायकारी, बेकायदा आणि कायद्यांचे उल्लंघन करणारा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शिक्षकांचे निलंबन उद्या दुपारपर्यंत विनाअट मागे न घेतल्यास, संपूर्ण जिल्ह्यात एसएसएलसी परीक्षेच्या उर्वरित 2 पेपरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघटनेचे सरचिटणीस रामू गुगवाड यांनी सांगितले की, ज्या सामूहिक कॉपीला जबाबदार धरून शिक्षकांचे निलंबन करण्यात आले ती नेमकी कुठे झाली याविषयी निलंबन आदेशात स्पष्टता नाही. केवळ, “सामूहिक कॉपी झाल्याने शिक्षकांचे निलंबन करण्यात येत आहे” असा मोघम उल्लेख त्यात आहे. मुळात परीक्षा केंद्रांवर सकाळी गटशिक्षणाधिकारी, दुपारी डीडीपीआय, माध्यान्ह आहार योजनेचे अधिकारी व कर्मचारी असताना सामूहिक कॉपी कशी काय केली जाऊ शकते? असा सवाल त्यांनी केला.
निलंबनाची प्रक्रियाही नियमाला धरून झालेली नाही. त्यासाठी योग्य पुरावे देऊन, पंचनामे करून, त्यावर शिक्षकांच्या सह्या घेऊन, कॉपी केलेल्या विध्यार्थ्यांना डीबार करून निलंबन आदेश जारी करावा लागतो. या प्रकरणात तसे कुठेही घडलेले नसून, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अजागृततेने हा बेकायदेशीर आदेश बजावला आहे. यातून शिक्षकांना धमकावून, त्यांच्यावर दबाव टाकून, त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले आहे. त्याचा कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघटना तीव्र शब्दांत निषेध करते. उद्या दुपारच्या आत सर्व शिक्षकांचे निलंबन मागे न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यातील एसएसएलसी परीक्षेच्या उरलेल्या दोन पेपरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे गुगवाड यांनी सांगितले.
बैठकीसाठी जिल्ह्याच्या विविध भागातून शिक्षक क्लब रोडवरील डीडीपीआय कार्यालयाच्या आवारात जमले होते. समाजमाध्यमांवर कोणी काही पोस्ट टाकल्यास विचलित होऊ नका, माध्यमिक सहशिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्षांशी संपर्क साधून बहिष्काराबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन रामू गुगवाड यांनी यावेळी शिक्षकांना केले. एकंदर, तब्बल 26 शिक्षकांना सामूहिक कॉपी प्रकरणी तडकाफडकी निलंबित केल्याचे जिल्ह्यातील माध्यमिक सहशिक्षकात संतप्त पडसाद उमटले आहेत.


Recent Comments