Belagavi

नंदिनी केएमएफचे अमूलमध्ये विलीनीकरण शक्य नाही : आ. भालचंद्र जारकीहोळी

Share

कर्नाटक मिल्क फेडरेशन अर्थात नंदिनी ही एक स्वायत्त, सार्वभौम सहकारी संस्था आहे. स्वबळावर उभी असलेल्या या संस्थेकडे दूध उत्पादक शेतकरी, ग्राहकांचे हितरक्षण करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत केएमएफचे अमूलमध्ये विलीनीकरण शक्य नाही, करू दिले जाणार नाही असे ठाम प्रतिपादन अध्यक्ष आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी केले.

नंदिनीचे अमूलमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या वावड्या सध्या राज्यात उठत आहेत. करवेसह काही संघटनांनी यावरून आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज पत्रकार परिषदेत केएमएफ अध्यक्ष आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी याबाबतची वस्तुस्थिती मांडून स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, केएमएफ अर्थात नंदिनी हा कर्नाटकाचा मानबिंदू आहे. यापूर्वीही नंदिनीचे अमूलमध्ये विलीनीकरण होणार अशा अफवा उठवण्यात आल्या होत्या. पण काही काळानंतर त्या शांत झाल्या. आता निवडणुकीच्या तोंडावर महिनाभर आधी पुन्हा या अफवा पसरविण्यात येत आहेत. यामागे विरोधी पक्षांचा राजकीय स्वार्थ आहे. सत्ताधारी भाजपचे नाव खराब व्हावे, त्यातून निवडणुकीत राजकीय लाभ उठवावा यासाठी हा डाव रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसकडून विशेषतः डीकेशी, सिद्दरामय्या यावरून जनतेची दिशाभूल सुरु केली आहे. किमान सिद्दरामय्या यांनी तर असे करू नये, कारण ते मुख्यमंत्री असताना त्यांनीही केएमएफचे काम पाहून काही योजना मंजूर केल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

आ. भालचंद्र जारकीहोळी पुढे म्हणाले की, केएमएफ ही सहकारी संस्था असल्याने सरकारला तिच्यावर दबाव आणता येत नाही. सहकारी कायद्यानुसार संचालक मंडळाचा निर्णयच अंतिम असतो. सदस्य नियुक्त संचालक, आयएएस अधिकारी संचालक मंडळात आहेत. राज्यभरात संस्थेचे 26 लाख शेतकरी सभासद असून 10 लाख दूध उत्पादक सदस्य आहेत. 15200 डेअऱ्या संस्थेशी जोडल्या असून, सुमारे 25 हजार खेड्यांशी केएमएफचा संबंध आहे. एवढ्या व्यापक विस्तारामुळे केएमएफशी 40 ते 50 लाख मतदार जोडले गेले आहेत. त्यांची दिशाभूल करून राजकीय लाभ मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी नंदिनीच्या विलीनीकरणाचं कुभांड रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

ग्राहकांना अत्यंत कमी, स्वस्त दरात दर्जेदार दूध आणि दुग्धोत्पादने नंदिनी ब्रँडखाली केएमएफ देते. त्यामुळेच नंदिनी ब्रँडला केवळ कर्नाटकच नव्हे तर गोवा,महाराष्ट्र व अन्य राज्यात चांगली मागणी आहे. मुंबईसारख्या महानगरात नंदिनी दूध ब्रँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. सभासद शेतकरी, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्यात केएमएफ आघाडीवर आहे. कर्मचाऱ्यांसाठी संस्थेने पेन्शन योजना राबवली आहे. नंदिनी ब्रॅंडने उत्तम दर्जा आणि माफक किंमतीमुळे ग्राहकांचा विश्वास कमावला आहे. त्यामुळे दहा अमूल जरी आले तरी स्पर्धा करण्याची ताकद नंदिनीमध्ये आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा केंद्र सरकारने आमच्यावर विलीनीकरणासाठी कसलाही प्रस्ताव किंवा दबाव आणलेला नाही. तसा प्रस्ताव दिला तरी आम्ही तो सर्वात आधी फेटाळून लावू असे भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. राजकारण सुरु असते, सरकारं येतात आणि जातात. मात्र कष्टाने उभे केलेल्या केएमएफ नंदिनीसारख्या सहकारी संस्था शेतकरी, सभासद, ग्राहकांच्या हितासाठी टिकल्या-वाढल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केवळ राजकारणासाठी नसत्या कंड्या पिकवून अशा संस्थांविषयी संभ्रम निर्माण करणे, त्यांच्या हिताच्या आड येणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधितांनी हा विषय येथेच सोडून द्यावा असे आवाहन भालचंद्र जारकीहोळी यांनी केले.

यावेळी केएमएफचे व्य्सव्थापकीय संचालक हेगडे उपस्थित होते.

Tags: