अथणी मतदार संघात महेश कुमठळ्ळी यांच्या विरोधात वातावरण आहे. म्हणून उद्या त्यांचा पराभव झाला तर त्याचे खापर माझ्यावर फोडू नका असे मी म्हटले होते. रमेश जारकीहोळी यांनी त्याचा गैरअर्थ का घेतला माहित नाही असे सांगत विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांनी रमेश यांच्यावर पलटवार केलाय.

‘लक्ष्मण सवदी मोठे नेते आहेत, पण अथणी मतदार संघात उमेदवारीवरून त्यांची निराशा झाली आहे’ असे वक्तव्य रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव सीमेवरील महाराष्ट्रातील शिनोळी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण सवदी म्हणाले, त्यांना काय म्हणायचे होते ते मला माहित नाही. मी मोबाईलवर ते पाहिले आहे. त्यावर मी आज टिप्पणी करणार नाही. पण मी वीस वर्षांपासून राजकारणात आहे.
मला लोकांच्या भावना कळतात. अथणी मतदार संघात महेश कुमठळ्ळी यांच्या विरोधात वातावरण आहे. म्हणून उद्या त्यांचा पराभव झाला तर त्याचे खापर माझ्यावर फोडू नका असे मी जाहीरपणे म्हटले होते. रमेश जारकीहोळी यांनी त्याचा गैरअर्थ का घेतला माहित नाही. योगायोगाने महेश कुमठळ्ळी हरले तर माझ्यावर त्या पराभवाचे खापर फोडू नका या भावनेने मी खुल्या सभेत तसे बोललो होतो. रमेश जारकीहोळी कोणत्या अर्थाने बोलले हे माहीत नाही, ते भेटल्यावर चर्चा करेन असे उत्तर सवदी यांनी दिले.
लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा आहे या प्रश्नावर, अशा अनेक अफवा पसरत असतात. पण असा विचार आजवर केलेला नाही. उद्या पक्ष काय सूचना देणार यावर हे सर्व अवलंबून आहे असे सांगत लक्ष्मण सवदी यांनी अधिक बोलणे टाळले.
एकंदर, अथणी मतदार संघात महेश कुमठळ्ळी यांच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे योगायोगाने त्यांचा पराभव झाल्यास त्याचे खापर माझ्यावर फोडू नका याचा पुनरुच्चार करत लक्ष्मण सवदी यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा महेश कुमठळ्ळी यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.


Recent Comments