कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

उमेदवार निश्चितीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची खानापुरातील कार्यालयात बैठक घेण्यात आली. पाच इच्छुकांनी समितीकडे उमेदवारीसाठी अर्ज केले होते. यामध्ये निरंजन सरदेसाई, विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी आणि रुक्मान्ना झुंजवाडकर यांचा समावेश होता. या पाचही इच्छुकांच्या मुलाखती निवड समितीने घेतल्या. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपसात चर्चा करून एकच एक उमेदवार देण्यासाठी वेळ देण्यात आला. मात्र त्यांच्यात एकमत न झाल्याने मतदान घेऊन उमेदवार निवडण्याचा निर्णय निवड समितीने घेतला.
दरम्यान, विलास बेळगावकर यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे चार इच्छुकांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात निवड समितीच्या 62 सदस्यांनी मतदान केले. त्यात मुरलीधर पाटील यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी तशी घोषणा केली. निवडीनंतर निवड समिती सदस्य आणि समिती कार्यकर्त्यांनी शिवस्मारकासमोरील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा दिल्या.


Recent Comments