सगळ्याच गोष्टी उघड करता येत नाहीत, पण भाजप अथणी मतदार संघात महेश कुमठळ्ळी यांनाच तिकीट देतील असा विश्वास माजी मंत्री, गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केलाय.
निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे बेळगाव ग्रामीण मतदार संघात हाय व्होल्टेज पॉलिटिक्स सुरु झाले आहे. विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा कोणत्याही परिस्थितीत पाडाव करण्याचा चंग बांधलेले माजी मंत्री, गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी येथे गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना अखेर गाठलेच. यावेळी अथणी मतदारसंघात भाजपच्या तिकिटासाठी माजी डीसीएम लक्ष्मण सवदी आणि महेश कुमठळ्ळी यांच्यातील संघर्षाबाबतच्या प्रश्नावर माजी मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले की, काही गोष्टी उघड करता येत नाहीत, पण मला 100% विश्वास आहे की महेश कुमठळ्ळी भाजपचे तिकीट मिळवतील. महेश आणि श्रीमंत पाटील यांच्यासह भाजपमध्ये दाखल झालेल्या सर्वांना भाजपचे तिकीट मिळणार आहे. यापूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या 17 आमदारांनाही भाजप हायकमांड आशीर्वाद देणार आहे असे ते म्हणाले.

‘महेश कुमठळ्ळी यांच्याऐवजी भाजपने मला तिकीट द्यावे, अशी भावना होती, महेश कुमठळ्ळी पराभूत झाल्यास त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा डाव आहे’, या लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रमेश जारकीहोळी म्हणाले, विजय-पराभव ही देवाची इच्छा, लक्ष्मण सवदी का निराश होतात कळत नाही.
आमच्याकडे वरिष्ठ नेते आहेत, ज्यांच्यासमोर मी काय किंवा लक्ष्मण सवदी झाडाची पाने आहेत. आमच्या राष्ट्रीय नेत्यांचा आम्हाला अभिमान आहे, ते योग्य निर्णय घेतील. लक्ष्मण अण्णा, तुम्ही एवढी चिंता का करताय? आरामात रहा असे रमेश जारकीहोळी म्हणाले.

शिनोळीत कसली बैठक घेताय? या प्रश्नावर नागेश मन्नोळकर यांच्या पाहुण्यांचा पूजा समारंभ आहे, खासगी कार्यक्रम आहे. त्याला मलाही निमंत्रण आहे म्हणून आलोय, कसलाही राजकीय कार्यक्रम, बैठक नाहीय असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदर, ग्रामीण मतदार संघाच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील शिनोळी येथे रमेश जारकीहोळी यांनी गुप्त बैठक घेतल्याच्या वृत्तानंतर बेळगाव ग्रामीण मतदार संघात हाय व्होल्टेज पॉलिटिक्स सुरु झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.


Recent Comments