Belagavi

बेळगावात महादंडनायक स्मरणोत्सव, लिंगायत धर्म चिंतन गोष्ठी

Share

लिंगायत धर्म महासभा आणि राष्ट्रीय बसव दलाच्या वतीने बेळगावात आज महादंडनायक स्मरणोत्सव आणि लिंगायत धर्म चिंतन गोष्ठी कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेळगावातील कुमार गंधर्व रंग मंदिरात परमपूज्य लिंगानंद स्वामीजी आणि डॉ. माते महादेवी यांच्या स्मरणार्थ महादंडनायक स्मरणोत्सव आणि लिंगायत धर्म चिंतन गोष्ठी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यावर चर्चा, पुरस्कार वितरण आणि विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. बेंगळूर येथील कुंबळगोडू चन्नबसवेश्वर ज्ञानपीठाचे पीठाधीश डॉ. चन्नबसवानंद स्वामीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला.

यासंदर्भात माहिती देताना डॉ. चन्नबसवानंद स्वामीजी यांनी सांगितले की, परमपूज्य लिंगानंद स्वामीजी आणि माते महादेवी यांच्यामुळे बसवतत्वांचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. त्यांचे स्मरण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी यासाठी सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून बेळगावात महादंडनायक स्मरणोत्सव आणि लिंगायत धर्म चिंतन गोष्ठी कार्यक्रम घेण्यात येतो. कुमार गंधर्व रंगमंदिरात आज पार पडलेल्या या कार्यक्रमात केवळ बेळगाव, कर्नाटकचा नव्हे तर महाराष्ट्र, आंध्र, तेलंगण या राज्यातूनही लिंगायत बंधुभगिनी उपस्थित राहिल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय बसव दलाचे सचिव आनंद गुडस यांनी सांगितले की, २१व्या शतकाच्या प्रारंभी परमपूज्य लिंगानंद स्वामीजी आणि माते महादेवी यांच्यामुळे बसवतत्वांचा प्रसार व प्रचार देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात झाला. त्यांच्यामुळे लिंगायत धर्माला खरी ओळख मिळाली. त्यामुळे त्यांचे स्मरण करणे हे लिंगायत समुदायाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळेच राष्ट्रीय बसव दलाच्या वतीने आज त्यांच्या स्मरणोत्सवाचे आयोजन केले आहे.

यावेळी सत्यादेवी माता यांचे आशीर्वचन झाले. लिंगायत धर्म संघर्ष समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भुशीकर,बसव सेवा दलाचे अध्यक्ष शंकर गुडस, महांतेश तोरणगट्टी, महांतेश गुडस, अशोक भेंडिगेरी आदी उपस्थित होते.

Tags: