Belagavi

काँग्रेसची तिसरी यादी संभाव्यता 10 एप्रिलनंतर : आ. सतीश जारकीहोळी

Share

काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी संभाव्यता 10 एप्रिलनंतर जाहीर होईल. दोन याद्यांनंतर काही ठिकाणी असंतुष्टांची नाराजी समोर आली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगावात काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक असतात. पण कोणा एकालाच उमेदवारी द्यावी लागते.शेवटी पक्षाचा निर्णयच अंतिम असतो. कित्तूर, सौंदत्ती, गोकाक मतदार संघातील असंतुष्ट आणि त्यांच्या संभाव्य बंडखोरीबाबतच्या प्रश्नावर बोलताना, पक्षनेते त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील. तरीही त्यांनी बंडखोरीची भूमिका कायम ठेवली तर तो त्यांचा निर्णय असेल. जे काँग्रेसशी एकनिष्ठ असतील ते आमच्यासोबत येतील अन्यथा निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत.

उमेदवारी जाहीर झालेल्यांची उमेदवारी रद्द करणं नवीन नाही, राजकारणात तसे होत असते. मात्र आमच्या पक्षात सहसा ते होत नाही असे सांगून सतीश जारकीहोळी म्हणाले की, तिकीट न मिळाल्याने इच्छुकांची नाराजी, बंडखोरीचा पवित्रा हे सगळ्याच पक्षात असते. काँग्रेसमध्येही ते आहे, पण सगळीकडे तसे चित्र नाही. बेळगाव जिल्ह्यात केवळ 1-2 ठिकाणी तसे घडले आहे. पक्षाने मतदार संघात सर्व्हे करून, मतदारांची मते जाणून घेऊनच उमेदवारी दिली आहे. कित्तूरमध्ये असो वा सौंदत्तीमध्ये, इनामदार व चोप्रा यांनी देखील सर्व्हेमध्ये अधिक पसंती असेल तरच उमेदवारी देण्यास पक्षाला सांगितले आहे असे ते म्हणाले.

राज्यात मोदी लाटेचा फारसा प्रभाव पडणार नाही असा दावा करून सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, महागाई, दरवाढ, सरकारचा 40 पर्सेंट भ्रष्टाचार, केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे अपयश तसेच आम्ही सत्तेवर आल्यास करणार असलेली विकासकामे, सत्तेत असताना केलेली विकासकामे आदी मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात या प्रमुख मुद्द्यांचा अंतर्भाव केले आहे. पाणी, शिक्षण, आरोग्य अशा मुद्द्यांवर देखील मतदारांशी संपर्क साधण्यात येईल. आमचे नेते-कार्यकर्तेच आमचे स्टार प्रचारक आहेत, त्यामुळे सेलिब्रिटींची आम्हाला गरज नाही असा टोला जारकीहोळी यांनी भाजप व अभिनेता सुदीप यांच्या प्रचारावरून मारला.

बेळगाव उत्तर मतदार संघात उमेदवारी देण्यावरून कसलाही गोंधळ, मतभेद नसल्याचेही आ. सतीश जारकीहोळी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags: