Belagavi

सौंदत्तीत सौरव आनंद चोप्रानी फडकावले बंडाचे निशाण

Share

काँग्रेसची उमेदवारी हुकल्याने सौंदत्तीत सौरव आनंद चोप्रानी बंडाचे निशाण फडकावले आहे. समर्थकांच्या सभेत सौरव आणि त्यांच्या मातोश्रीना अश्रू अनावर झाले. याचदरम्यान बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा सौरव चोप्रा यांनी केली.

सौरव चोप्रा यांना दुसऱ्या यादीतदेखील काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने सौंदत्ती मतदारसंघात असंतोष उफाळून आला आहे. सौंदत्ती शहरात त्यांचे वडील आनंद चोप्रा यांच्या चाहते व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या गर्दीत येऊन काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला राग काढला. त्याच प्रसंगी चाहते व कार्यकर्त्यांना संबोधित करताना सौरव चोप्रा म्हणाले की, किमान दुसऱ्या यादीत तरी आपल्याला तिकीट मिळेल अशी आशा होती. आमच्या वडिलांना काँग्रेसची उमेदवारी दोनवेळा हुकली असली तरी. मला ती मिळेल अशी आशा होती.

 

पण ती खोटी ठरली त्यामुळे मी खूप दुखावलो गेलो आहे. म्हणून मी यावेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता, पण सौंदत्ती मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्याने निवडणूक लढवणार आहे. तुम्ही आमच्या वडिलांवर आणि माझ्यावर दाखविलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल मी खूप आभारी आहे.जिंकल्यावर काँग्रेस पक्षाला दाखवून देऊ असे आव्हान त्यांनी दिले.त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे सांगताच कार्यकर्त्यांच्या आणि चाहत्यांनी आनंदाने एकच जल्लोष केला.

एकंदर सौंदत्ती मतदार संघात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पण मतदार राजा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सौरव आनंद चोप्रा यांना कौल देणार का, पक्षाचे अधिकृत उमेदवार विश्वास वैद्य यांना, हे १३ मे रोजी निकालावेळीच स्पष्ट होणार आहे.

Tags: