Dharwad

अंतर्गत आरक्षण वाढवून वंचित घटकांना दिला न्याय : मुख्यमंत्री बोम्मई

Share

समाजातील वंचित, शोषितांना, कष्टकऱ्यांना समान संधी आणि मुख्य प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या सरकारने अंतर्गत आरक्षण वाढवून त्यांना न्याय दिला आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

आदी बनजिग समाजाला 2-डी आरक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल बोम्मई यांचा मतदारसंघ शिग्गाव येथे आदी बनजिग समाजातर्फे मुख्यमंत्री बोम्मई यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारून बोलताना ते पुढे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत सर्व समाजघटकांना प्रगती साधण्याचा हक्क देणे हाच आपल्या घटनेचा मूलमंत्र आहे. तो लक्षात घेऊन वंचित समाजघटकांच्या कल्याणासाठी आमच्या सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आदी बनजिग समाजानेही आरक्षणासाठी अनेक वर्षे संघर्ष केला, आंदोलने केली. बेळगाव अधिवेशनात या समाजाच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन हा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी मी फार काही बोललो नाही, केवळ प्रतीक्षा करा म्हणून सांगितले. त्यानंतर या समाजाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना 2-डी आरक्षण नुकतेच मंजूर केले आहे. या समाजाने आपले संघटन मजबूत करण्यासह आर्थिक आणि शिक्षण संस्थादेखील काढून प्रगती साधावी, माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी तुमच्यासोबत राहून तुमच्या समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे असे बोम्मई यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानचे धर्मदर्शी व शिग्गाव आदी बनजिग समाजाचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. यावेळी आदी बनजिग समाजाला आरक्षण दिल्याबद्दल समाजातर्फे मुख्यमंत्री बोम्मई यांचा शाल, भव्य पुष्पहार घालून, रेणुका-यल्लम्मा देवीची प्रतिमा देऊन साकार करण्यात आला.

यावेळी आदी बनजिग समाजाचे राज्य अध्यक्ष सदाशिव कारटगी, माजी आमदार सीमा मसुती यांच्यासह समाजाचे अनेक नेते, मान्यवर उपस्थित होते.

Tags: