कित्तूर मतदार संघात काँग्रेसचे एकनिष्ठ नेते माजी मंत्री डी. बी. इनामदार यांच्या कुटुंबियांना उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसशी काडीमोड घेण्याचा निर्णय इनामदार कुटुंबीयांनी घेतला आहे. इनामदार यांची सून लक्ष्मी विक्रम इनामदार यांनी बेळगावात आज पत्रकार परिषदेत डोळ्यात पाणी आणून हा निर्णय जाहीर केला.

गेल्या ४०हुन अधिकवर्षे काँग्रेसचे एकनिष्ठ शिलेदार माजी मंत्री डी. बी. इनामदार यांना खासकरून त्यांच्या कुटुंबातील एकाला काँग्रेसची उमेदवारी मिळेल अशी अटकळ होती. मात्र काँग्रेसने कित्तूरमध्ये बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने इनामदार कुटुंबियांना तसेच त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर इनामदार यांचे मूळ गाव असलेल्या नेगिनहाळमध्ये काल समर्थकांनी टायर जाळून काँग्रेसचा निषेध केला. त्यानंतर इनामदार यांच्या सून लक्ष्मी विक्रम इनामदार यांच्या उपस्थितीत समर्थकांनी बैठक घेऊन पक्षाच्या निर्णयाचा एकमुखी निषेध केला. त्यानंतर लक्ष्मी विक्रम इनामदार यांनी आज बेळगावात कॅम्पमधील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन डोळ्यात पाणी आणून उमेदवारी कशी नाकारण्यात आली याचा घटनाक्रम सांगितला.
लक्ष्मी इनामदार म्हणाल्या की, काँग्रेसकडून डी. बी. इनामदार यांच्या आजारपणांत धीर देण्याऐवजी असा निर्णय घेऊन उलट वेदना वाढविल्या आहेत. त्यामुळे आमच्या समर्थकांत तीव्र नाराजी पसरली आहे. डी. बी. इनामदार बेंगळूरला गेले असता, अस्वस्थ वाटू लागल्याने मणिपाल इस्पितळात उपचारांसाठी दाखल झाले होते. तेथे त्यांना आधी बरे वाटले. पण नंतर त्यांना जास्त आल्याने चाचण्या केल्या असता, एचवनएनवनएचथ्रीएनटू पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यामुळे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. देवाच्या आशीर्वादाने त्यांची प्रकृती आता सुधारत आहेत. या दरम्यान, त्यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी फोन केले होते. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणीही फोन केला नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
मी स्वतः कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारीसाठी काँग्रेस हायकमांडना भेटले, दिल्लीतही जाऊन हायकमांडची भेट घेतली. पण काही उपयोग झाला नाही. काही दिवसांनी मला बेंगळूरहून पक्षश्रेष्ठींचा फोन आला. त्यांनी मला, तू उच्चशिक्षित आहेस, धाडसी आहेस, तुला दुसरे एखादे पद देता येईल असे सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी डी. बी. इनामदार यांनी इतकी वर्षे निष्ठेने काम केले. पण त्याची जाणीव काँग्रेसने ठेवली नसल्याचे सांगून येत्या दोन दिवसांत विक्रम इनामदार आल्यावर कार्यकर्ते, समर्थकांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. डी. बी. इनामदार ज्येष्ठ आहेत, त्यांचे माहित नाही, पण आम्ही सर्व इनामदार कुटुंबीयांनी काँग्रेसचा त्याग करण्याचे ठरविले आहे. राजीनामा पत्रे तयार आहेत, केवळ सह्या करणे बाकी आहे असे सांगत इनामदार कुटुंबीय काँग्रेसशी काडीमोड घेणार असल्याचे स्पष्ट संकेत लक्ष्मी विक्रम इनामदार यांनी यावेळी दिले.
काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेले बाबासाहेब पाटील इनामदार कुटुंबांचे नातेवाईक, किंवा डी. बी. इनामदार यांचे भाचे नसल्याचे लक्ष्मी इनामदार यांनी स्पष्ट केले.


Recent Comments