बेळगावातील टिळकवाडीतील तिसऱ्या फाटकावरील उड्डाणपूल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीस खुला झाला आहे. आता त्याच्या शेजारीच आणखी एका उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार असून या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे.
पाच-सहा दिवसांपासून तिसरे रेल्वे गेट वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना उड्डाणपुलावरून किंवा काँग्रेस रोडचा उपयोग करावा लागणार आहे.
तिसऱ्या रेल्वे फाटकावर दुतर्फा वाहतुकीसाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यापैकी पहिल्या टप्प्यात एका बाजूचा पूल आणि दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या बाजूच्या पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात उड्डाणपुलाची उभारणी सुरू करण्यात आली होती. २०१८ मध्ये उड्डाणपुलाच्या उभारणीस प्रारंभ करण्यात आला. मात्र लागलीच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने पुलाचे काम करण्यास अडचण निर्माण झाली होती.
त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामासाठी आलेले परराज्यातील कामगार आपल्या गावी निघून गेल्याने उड्डाणपुलाच्या उभारणीत अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर आता तब्बल दोन वर्षांनंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून अलीकडेच हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आलाय.
आता दुसऱ्या बाजूच्या उड्डाणपुलाच्या . उभारणीचे काम सुरू करण्यात आले असून न निवडणुकीच्या तोंडावर साहित्याची जमवाजमव करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीबाबत कोणताच गाजावाजा न करता भूमिपूजन न करता थेट काम सुरू करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महिन्यापूर्वी सर्व साहित्य दाखल झाले आहे. कंत्राटदाराने आठवड्यापूर्वी या कामाला प्रारंभ केला आहे. त्यामुळे तिसऱ्या रेल्वे फाटकावरील दुसऱ्या बाजूचा रस्ता आता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनगोळ नाक्यापासून तिसऱ्या रेल्वेगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनधारकांना ये-जा करता येणार नाही. या रस्त्यावर पायाखोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे.
यंत्रोपकरणाद्वारे पिलर उभारणीसाठी हे काम करण्यात येत आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी उड्डाणपूल अथवा काँग्रेस रोडचा वापर करावा लागणार आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर तिसरे रेल्वेफाटक वाहतुकीसाठी कायमस्वरुपी बंद राहण्याची शक्यता आहे.


Recent Comments