तुम्ही हे जे दृश्य पाहताय ते कुठल्या मागास खेड्यातले नाही, तर दुसरी राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्टसिटी बेळगाव शहरातील आहे. येथील रहिवाशांना अवकाळी पावसाच्या तोंडावर चांगलीच धडकी भरते. जोराच्या वळवाने किंवा नियमित पावसाने येथील नाला भरला की, त्यांच्या घरात घुसून पाण्याचे तांडव सुरु होते. त्यामुळे कुटुंबकबिला घेऊन जवळच्या मनपा इमारतीत त्यांना स्थलांतरित व्हावे लागते. तर मग असा कोणता हा प्रदेश आहे? चला पाहुयात या विशेष रिपोर्टमधून…
होय, हळूहळू अरुंद होत गेलेला हा नाला, त्यात साठलेला प्लास्टिकचा आणि अन्य कचरा, बाजूला उगवलेली झाडे-झुडुपे, त्यामुळे साठलेले सांडपाणी जे पावसाळ्यात नाला तुडुंब भरून शेजारील घरांमध्ये पाणी घुसण्यास पुरेसे आहे. हे चित्र आहे, राज्याची दुसरी राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्टसिटी बेळगाव शहरातील.
बेळगाव महानगर पालिकेच्या हद्दीतील कोनवाळ गल्लीतील हा नाला दर पावसाळ्यात येथील रहिवाशांच्या जीवावर उठतो. शहराची स्वच्छता, साफसफाई करण्याची आणि नागरिकांना रोगमुक्त ठेवण्याचा वसा घेतलेल्या बेळगाव महानगर पालिकेकडून या नाल्याची ना सफाई केली जाते, ना देखभाल. येथे लहान मुले, वृद्धांच्या जीवाला जपण्यासाठी कट्टा बांधला जात नाही. सगळे काही रामभरोसे. त्यामुळेच हा नाला वळवाच्या किंवा मोठ्या मोसमी पावसात येथील रहिवाशांच्या जीवावर उठतोय. अनेकदा तक्रारी करूनही नगरसेवक, आमदार, मनपा अधिकारी याची दखल घेत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केलाय.
कोनवाळ गल्लीतील या नाल्यात वाऱ्याने उडून येणारा कचरा, प्लास्टिक व अन्य कचरा मिसळतो. त्यामुळे येथील सांडपाण्याचा नीट निचरा होत नाही. बेळगाव मनपाकडून त्याची नियमित देखभाल, साफसफाई केली जात नसल्याने सांडपाणी साठून राहते. परिणामी येथे डासांची, कीटकांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे नाला परिसरातील रहिवाशांना सांसर्गिक रोगांची लागण होत आहे. लोकांना नाहक दवाखाना, औषधपाण्यावर खर्च करावा लागतो.
या संदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना येथील रहिवाशांनी आपली आपबिती सांगितली. एका युवकाने सांगितले की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या नाल्याची सफाई करणे आवश्यक आहे. त्याशिवाय वर्षातून काहीवेळा सफाई केली पाहिजे. मात्र याबाबत रहिवाशी स्थानिक नगरसेवक, मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडे तक्रार करून दमले आहेत. कारण त्यांच्याकडून आमच्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही. तक्रार केल्यावर आम्ही येऊ, नाल्याची सफाई करू, निधी मंजूर झाला आहे, कट्टा बांधून देऊ अशी तोंडावर आश्वासनं दिली जातात. पण प्रत्यक्षात काहीच कृती केली जात नाही. नाल्याच्या भोवती मजबूत कट्टा नसल्याने येथील लहान मुलांना आणि वृद्धांना धोका निर्माण झाला आहे. ते चुकून नाल्यात पडून दुर्घटना घडण्याची भीती आहे.
कोनवाळ गल्ली नाला परिसरात राहणाऱ्या महिलांनीदेखील मनपा अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडली. या भागात नाला तर सोडाच पण रस्त्याशेजारील गटारीही नियमित साफ केल्या जात नाहीत. गटारी आणि नाल्याच्या सफाईअभावी येथे दास, कीटकांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असून आम्हाला सांसर्गिक रोगांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार या महिलांनी केली. दोन वर्षांपासून नाल्याची सफाई न केल्याने पाणी साठून आहे. भर पावसात नाला तुडुंब भरून त्याचे पाणी आमच्या घरात घुसण्याची भीती आहे. यापूर्वी आम्ही हा भीतीदायक अनुभव घेतला आहे. त्यावेळी अतिवृष्टीमुळे आम्हाला आमची जनावरे, कुटुंबकबिला घेऊन मनपा गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची वेळ आली होती. तशी वेळ येऊ नये म्हणून मनपाने दखल घेऊन नाल्याची सफाई करावी अशी मागणी महिलांनी केली.
एकंदर, दुसरी राजधानी आणि स्मार्टसिटी म्हणविल्या जाणाऱ्या बेळगाव शहरातील रहिवाशांना अशातऱ्हेने भीतीच्या वातावरणात रहावे लागणे हे नागरी सुविधा पुरविण्यासाठी जबाबदार म्हणवून घेणाऱ्या बेळगाव महानगर पालिकेला मुळीच शोभण्यासारखे नाही. त्यामुळेच येथील रहिवाशानी केलेल्या आक्रोशाची दखल घेऊन किमान आतातरी बेळगाव मनपा जागे होऊन कार्यवाही करणार का याची प्रतीक्षा करावी लागेल.
Recent Comments