रामदूत हनुमानाची जयंती आज बेळगाव शहर व परिसरात श्रद्धा-भक्तिभावाने साजरी करण्यात येत आहे.
पवनपुत्र, अंजलीसुत, महाबली, रामदूत, महारुद्र, बजरंग बली हनुमान अशा विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या शक्ती-युक्तीचा संगम असलेल्या शक्तिदेवता मारुतीरायाच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहर व परिसरातील हनुमान मंदिरांनी आज वेगळाच साज धारण केल्याचे दिसून आले. हनुमान जयंतीनिमित्त शहरातील हनुमान मंदिरात आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सर्व वयोगटातील भक्तांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली.
बेळगावातील मारुती गल्लीतील मारुती मंदिर, यंदे खुंटावरील विवेकानंद चौकातील हनुमान मंदिर, संयुक्त महाराष्ट्र चौकातील हनुमान मंदिर, आरटीओ चौकातील सोन्या मारुती मंदिर, रामतीर्थ नगरातील अंजनेय मंदिर, शहापूर खडेबाजारातील मारुती मंदिर, बाजार गल्ली, वडगाव येथील मारुती मंदिर, हिंदवाडी घुमटमाळ येथील मारुती मंदिर, राणी चन्नम्मा नगरातील श्री गणपती-हनुमान मंदिर, पाईपलाईन रोड, गणेशपूर-विजयनगर, जयनगर, हिंडलगा येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर यासह विविध ठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, हनुमान जन्मोत्सव, पाळणा उत्सव, होमहवन आदी विधी करण्यात आले. अनेक मंदिरांसमोर नारळ, कपूर, उदबत्त्या, फुले, तेल आदी पूजा साहित्याचे छोटे-मोठे स्टॉल्स उभारण्यात आले होते. तेथे खरेदी केलेल्या साहित्यासह मंदिरात जाणून बजरंग बलीची मनोभावे पूजा करून दर्शन घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर कृतार्थ मनोभाव दिसून आला.
अनेक मंदिरात दुपारी हनुमान जयंतीनिमित्त भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


Recent Comments