Belagavi

आंबेडकर जयंती अर्थपूर्णरित्या साजरी करणार : पोलीस आयुक्त-दलित नेत्यांच्या बैठकीत निर्णय

Share

येत्या 14 एप्रिल रोजी असलेली घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांतता, सौहार्दात अर्थपूर्णरित्या साजरी करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त आणि दलित नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

बेळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस समुदाय भवनात शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आज आंबेडकर जयंती साजरी करण्यासंदर्भात आंबेडकर जयंती उत्सव मंडळ पदाधिकारी आणि दलित नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत उपस्थितांचे विचार ऐकून घेतले. फ्लो
यावेळी बोलताना विविध दलित नेत्यांनी, आंबेडकर जयंती उत्सव संपूर्ण राज्यात बेळगावातच भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. तो पाहण्यासाठी, सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून दलित बांधव मोठ्या संख्येने येतात. त्यांना बेळगाव मनपातर्फे पिण्याचे पाणी, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आंबेडकर जयंती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या चित्ररथांना तातडीने परवानगी द्यावी, त्यांची अडवणूक पोलिसांनी करू नये, सुरळीत मिरवणूक पार पाडण्यासाठी योग्य बंदोबस्त ठेवून उपाययोजना करावी आदी मागण्या केल्या.

यावेळी बोलताना शहर पोलीस आयुक्त बोरलिंगय्या म्हणाले की, सध्या निवडणूक जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता जारी झाली आहे. त्यामुळे मिरवणुकीतील चित्ररथांना पोलीस ठाण्याऐवजी स्वतंत्र सिंगल विंडो व्यवस्थेअंतर्गत परवानग्या देण्यात येतील. आंबेडकर जयंती उत्सव आणि मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस पूर्ण सहकार्य देतील. मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही वेळेत मिरवणूक सुरु करून वेळेत संपेल याची दक्षता घ्यावी. सर्वानी नियम पाळावे, प्रत्येक पोलीस ठाण्याचे निरीक्षक १४ एप्रिलच्या आत किमान दोन बैठक घेऊन उत्सव, मिरवणुकीचे नियोजन करतील अशी ग्वाही त्यांनी दिली. उत्सवात डॉ. बाबासाहेबांचे विचार, संदेश सर्वांपर्यन्त पोहोचविण्यासाठी दक्षता घेऊन अर्थपूर्णरित्या आंबेडकर जयंती साजरी करूयात असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत ज्येष्ठ दलित नेते मल्लेश चौगुले, आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बसवराज रायवगोळ, महेश कोलकार, बाबू पुजारी आदींनी महत्वपूर्ण सूचना केल्या.
यावेळी डीसीपी पी. व्ही. स्नेहा, मार्केट उपविभागाचे एसीपी प्रशांत सिद्दनगौडर, खडेबाजारचे एसीपी अनिलकुमार कोलकार, ग्रामीण एसीपी गोपालकृष्ण गौडर, क्राईम एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यासह विविध पोलीस अधिकारी, विविध दलित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: